नागपूर - गेल्या २४ तासांत राज्याची उपराजधानी नागपूर जिल्ह्यात ३ हजार ७५८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. महत्वाचे म्हणजे, आजही नागपुरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या पन्नाशीच्या पार गेली आहे. २४ तासांत नागपूरमध्ये तब्बल ५४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज ३ हजार ३०५ रुग्णांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे.
हेही वाचा - श्रद्धानंद अनाथालयातील विद्यार्थिनींच्या निश्चयाची 'गुढी'
जिल्ह्यात ३ हजार ७५८ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने एकूण कोरोनाबधित अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४१ हजार ५२९ इतकी झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये १ हजार १०० रुग्ण हे नागपूर जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतील आहेत, तर २ हजार ६५२ रुग्ण हे नागपूर महानगरपालिकेच्या दहा झोन अंतर्गत येणाऱ्या विविध भागांतील आहेत. आज जिल्ह्यात १४ हजार ६७६ टेस्ट करण्यात आल्या, ज्यामध्ये ९ हजार ४८७ आरटीपीसीआर, तर ५ हजार ८९ अँटिजेन टेस्टचा समावेश आहे. आज ५४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये २१ रुग्ण ग्रामीण नागपूरचे, तर २७ रुग्ण शहरातील आहेत. या शिवाय मृतकांमध्ये ६ रुग्ण हे नागपूर जिल्ह्याच्या बाहेरील आहेत. आज ५४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ५ हजार ४३८ इतका झाला आहे.
सहा दिवसांत ३४० रुग्णांचा मृत्यू
नागपूर शहरात आणि जिल्ह्यात ज्या वेगाने नागरिकांना कोरोना होत आहे, त्याच वेगाने रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू होत असल्याच्या घटना घडत आहेत. आज देखील ५४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एप्रिल महिन्याच्या सहा दिवसांत तब्बल ३४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची संख्या अशीच वाढत राहिल्यास येत्या चार दिवसांत हा आकडा पाचशेच्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, नागपूरमध्ये असलेली भयवाह परिस्थिती पुढे आली आहे, तरी देखील नागरिकांच्या मनातील बेफिकीरी गेलेली नाही. त्यामुळे, प्रशासन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात कमी पडत असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.
हेही वाचा - एप्रिलच्या पहिल्या पाच दिवसात 286 जणांचा मृत्यू; 19 हजार बाधितांची भर