नागपूर - टाळेबंदीचीच्या काळात तळीरामांसाठी दारूचा मिळवण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांचा धंदा जोरात सुरू आहे. एरवी शहराच्या बाहेर अवैध दारू निर्मितीचे कारखाने उघडले जायचे. मात्र लॉकडाऊनमुळे शहरातील ग्राहक तिथे पोहचू शकत नसल्याने शहरातील लोकवस्त्यांमध्येसुद्धा अवैध दारू तयार करून विकली जात आहे.
लॉकडाऊनमुळे शहरात दारूची दुकान बंद आहे आणि तळीरामांची संख्या मोठी असल्याने अवैध दारूची मागणी चांगलीच वाढली आहे. याचा फायदा घेत नागपूर शहरात दारू बनविण्याचा अड्डा सुरू झाला होता. अजनी पोलीस स्टेशन हद्दीत टोळी भागात घरात दारू बनविली जात होती. त्यावर अजनी पोलीस स्टेशन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत मोठ्या प्रमाणात दारू बनविण्याचा कच्चा माल नष्ट केला. त्या ठिकाणी सगळी दारू जमिनीवर ओतून देण्यात आली. दारू बनविण्याच्या या कामात महिला सुद्धा सहभागी होत्या.
लॉकडाऊनमुळे शहरात दारू मिळत नसल्याचा फायदा घेत ही दारू बनवून महागड्या दरात विक्री केली जात होती.