हैदराबाद - काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघातील जनतेने आशीर्वाद दिला, तर त्यांची सेवा करायला आवडेल, असे सांगत काटोलवर लागलेला डाग मिटावायचा असल्याचे वक्तव्य माजी आमदार काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केले. डॉ. आशिष देशमुखांनी नुकतीच 'ईटीव्ही भारत'ला मुलाखत दिली असून पुढील निवडणूक काटोल येथून लढण्याचे संकेत दिले आहेत.
सविस्तर मुलाखतीसाठी - Special Interview : मंत्रीपदावरून सुनील केदारांची हकालपट्टी करा! देशमुखांचा केदारांवर रोष का?
'हा डाग मिटवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही' -
माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघातून निवडून आले आहेत. गृहमंत्री असताना त्यांच्यावर गंभीर आरोप झाल्याने त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे मतदारसंघावर त्याचे दुर्लक्ष झाल्याने आशिष देशमुख सक्रीय झाले आहेत. आशिष देशमुख म्हणाले, 'मी आमदार असताना अनेक प्रकल्प हाती घेतले होते. ते भविष्यात पूर्ण करायचे आहे. काटोलची ओळख देशात निर्माण करण्याचे व्हिजन माझ्याकडे आहे. तसेच मागच्या काही दिवसांत काटोल आणि जनतेवर डाग लागला आहे. त्यामुळे हा डाग मिटवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.'
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा मतदारसंघ -
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप झाल्याने पदाचा राजीनामा द्यावा लागला. ही संधी साधत आशिष देशमुख यांनी आपला मोर्चा काटोलकडे वळवला आहे. याआधी 2014ला पुतणे आशिष देशमुख यांनी काका अनिल देशमुखांचा पराभव करत काटोलमधून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक जिंकली होती. त्यानंतर आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2019 ला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात ते रिंगणात होते. आता पुन्हा काटोलमधून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीत हा मतदारसंघ नेहमीच राष्ट्रवादीकडे राहिला आहे. त्यामुळे आशिष देशमुखांचा काँग्रेसकडून लढण्याचा दावा कितपत खरा ठरेल, हे पुढील काळातच स्पष्ट होईल.