नागपूर : महाराष्ट्राच्या विकासात सर्वांत चांगला महामार्ग म्हणून प्रसिद्ध असलेल्या समृद्धी महामार्गावर उद्घाटनापासून अपघातांची जीवघेणी मालिका सुरू आहे. त्यामुळे या महामार्गाविषयी मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण वाहनधारकांमध्ये पसरले आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि ती नाकारता येणार नाही. समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा अभ्यास ज्यावेळी सुरू करण्यात आला तेव्हा 'हायवे संमोहन' प्रकार पुढे आला.
'ही' कारणे कारणीभूत : वाहनधारकांच्या डोळ्यासमोर एकसारखे दृश्य येत असल्याने ड्रायव्हरला झोप येणे, चालकाचे वाहनांच्या गतीवर नियंत्रण नसणे अशासारख्या मानवी चुका याअपघातासाठी कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास येत असल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे.
समृद्धीवरील अपघातांचा लेखाजोखाच : समृद्धी महामार्गावर आतापर्यंत झालेल्या रस्ते अपघातात मृत्यू पावलेल्यांचा लेखाजोखाच सिंघल यांनी मांडला आहे. समृद्धी महामार्गावर आतापर्यंत एकूण ७२९ अपघाताच्या घटना या घडल्या असून २६२ गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत. ४७ अपघाताच्या घटनेत १०१ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ४४ मृत्यू ड्रायव्हरला झोप लागल्याने तर ३३ जणांचा मृत्यू वाहनाच्या अतिवेगामुळे झाला. १० जणांचा मृत्यू गाडीचे टायर फुटल्यामुळे तर ११ जणांचा मृत्यू अन्य कारणांमुळे झाला आहे. या महामार्गावर प्राण्यांच्या आवागमनामुळे ८३ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. बुलडाणा-वाशिम या २०० ते ३०० किलोमीटरच्या टप्प्यात सर्वाधिक अपघात झाले आहेत. रात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत झालेल्या रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू झाले अशी माहिती रवींद्र सिंघल यांनी दिली.
बस अपघातांनतर उपाययोजना: समृद्धी महामार्गावर वाहतूक सुरू झाल्यापासून महामार्गावर अपघाताचे सत्र वाढले आहेत. मात्र १ जुलैच्या ट्रॅव्हल्स बसच्या दुर्घटनेनंतर वाढत्या अपघातास प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. १ जुलै रोजी ट्रॅव्हल्स बसच्या दुर्घटनेनंतर अपघातास प्रतिबंध घालण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपययोजनेनंतर मात्र अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे.
अपघातांची वेळ: समृद्धी महामार्गावर रात्री १२ ते पहाटे ३ दरम्यान ९१ अपघात झाले असून यात ४४ जणांचा मृत्यू झाला. पहाटे ३ ते सकाळी ६ दरम्यान १४६ अपघातात ९ मृत्यू झाले आहेत तर सकाळी ६ ते दुपारी १२ वाजताच्या दरम्यान २११ अपघाताची नोंद असून त्यात २२ मृत्यू झाले आहेत. दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजताच्या काळात १६८ अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती सिंघल यांनी दिली.
१ हजार ४ ब्लॅक स्पॉट: राज्यात अपघातांचे १ हजार ४ ब्लॅक स्पॉट असून नाशिक, पुणे, नगर, सोलापूर व जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक अपघात होतात. हे ब्लॅक स्पॉट कसे कमी करता येईल, यावर वाहतूक विभाग काम करीत आहे. रस्ते अपघात फार मोठी समस्या आहे. २०२२ या वर्षात जगात अपघातांमुळे 13 लाख जणांचा मृत्यू झाला. याच वर्षात भारतामध्ये 1 लाख 53 हजार जणांचा तर महाराष्ट्रात 15224 जणांचा मृत्यू झाला आहे.
'ब्लॅक स्पॉट्स' म्हणजे काय? राज्यात नाशिक, पुणे, नगर, सोलापूर, जळगाव जिल्ह्यात जास्त अपघात आणि मृत्यू होतात. राज्यात १ हजार ४ ब्लॅक स्पॉट्स आहेत. ५०० मीटर अंतरावर गेल्या ३ वर्षात ५ किंवा जास्त अपघात झाल्यास अशा स्थळास ब्लॅक स्पॉट म्हणतात. १० किंवा जास्त मृत्यू ५०० मीटरच्या अंतरात झाल्यास त्यालाही ब्लॅक स्पॉट म्हणतात, असे राज्य वाहतूक सुरक्षा विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रवींद्र सिंघल यांनी सांगितले.
हेही वाचा:
- Bus Accident On Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, बस ट्रकच्या अपघातात 18 प्रवाशी जखमी
- Buldhana Bus Accident: समृद्धी महामार्गावरील अपघाताचे धक्कादायक कारण, फॉरेन्सिक अहवालातून समोर आली माहिती
- Samruddhi Highway Accident: कार दुभाजकावर आदळल्याने समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात, चार जण ठार