नागपूर - उपराजधानी नागपुरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालकमंत्री नितीन राऊत यांनी आगामी काळात लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवली आहे. असे झाल्यास सर्वाधिक जबाबदारी आणि ताण हा पोलीस यंत्रणेवर येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनची परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांची तयारी आहे का? हे जाणून घेण्यासाठी बंदोबस्तात तैनात असलेल्या काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी बातचीत केली.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त -
नागपूर शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाकडून दोन दिवसांचा वीकएन्ड कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यानुसार आज शहरातील सर्व बाजारपेठांसह दुकाने आणि व्यापारी संकुले (मॉल) बंद आहेत. त्यामुळे आज सकाळ पासूनच शहरातील रस्त्यांवर फारशी वर्दळ दिसत नाही. नागपूर पोलिसांनी प्रत्येक रस्त्यावर आणि चौकात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात यावी, यासाठी मनपा प्रशासनासोबत पोलीस विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी देखील गेल्या काही दिवसांपासून बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करत आहेत.
गरज पडल्यास प्रशासनाकडून भविष्यात लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचा दावा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केला आहे. शहरात तैनात असलेल्या पोलिसांनी देखील वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे सांगितले आहे. मात्र, कोरोना रुग्ण वाढल्यामुळे नागरिकांनी स्वतःहून नियम पाळण्यास सुरुवात केल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले आहे. लॉकडाऊन कुणालाही नको आहे, तो परवडणार नसल्याने लोकांनी आता बाजारांमध्ये गर्दी कमी केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.