नागपूर- शहरात उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात येत आहे. शहरातील रस्त्यांवर विविध रंगांचे सडे पडले असून रंगपंचमीच्या सकाळीच बालचमूंनी रंगांची उधळण करत या आनंदाला सुरुवात केली. नागपूरातील मंगलदीप नगरमध्ये देखील रंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पाण्याची बचत व्हावी म्हणून येथील रहिवाशांनी कोरडी होळी खेळली.
रंगांची उधळण करत होळीच्या गितांवर ठुमकेही लावले. परिसरातील सर्व नागरीक आज होळी निमित्ताने एकत्र येऊन रंगोत्सवात सहभागी झाले होते. या आनंदात भर टाकली ती युवकांच्या खास सेलिब्रेशनने. या वर्षीची रंगपंचमी कशा पद्धतीने साजरी करायची याचे नियोजन काही जणांनी आधीच केले होते. काही जणांनी नुसत्याच शुभेच्छा देण्यात धन्यता मानली तर काही जणांनी थेट घरी जाऊन रंग लावून आनंद साजरा केला.
चौकाचौकात रंगाची उधळण करण्यास सुरुवात झाली. मित्रमैत्रिणींना घरी जाऊन रंग लावण्याची पद्धत असल्याने दुचाकीवरून रंग लावलेले युवक ये-जा करत होते. या सर्वांच्या बरोबरीने ज्येष्ठ नागरिकही होते. आपल्या परिसरातील मित्र, तसेच परिवारासोबत त्यांनी सण साजरा केला.