नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा समावेश करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच संघाचा थेट अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता या मुद्यावर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
देशाच्या उभारणीत १९४७ पर्यंत संघाची भुमिका काय होती, हा भाग विद्यार्थ्यांना शिकवण्याचा निर्णय नागपूर विद्यापीठाने घेतला आहे. देशातील कोणत्याही विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात यापूर्वी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला स्थान देण्यात आले नव्हते. या आधी तसा प्रयत्न झाला नाही, असे झाले नाही. मात्र, आता विद्यापिठाने या अभ्यासक्रमामध्ये संघाचा समावेश केल्याने नवीन वाद उफाळून आला आहे.
नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २७ सप्टेंबर १९२५ रोजी झाली होती. बी.ए.च्या इतिहासात संघ स्थापनेपासून स्वातंत्र्यप्राप्तीच्या कालखंडात झालेल्या विविध घटना, घडामोडी यांचा उल्लेख अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. संघाने स्वातंत्र्य आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला नसल्याचे राजकीय स्तरावर आरोप करण्यात येतात. त्या आरोपांना उत्तर म्हणून अभ्यासक्रमातच संघाची राष्ट्रनिर्माणातील भूमिका हा विषय आणण्यात आला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.