नागपूर - हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची अखेर मृत्यूशी झुंज संपली आहे. सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पीडितेला ह्रदयविकाराचा झटका आला. अखेर सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिची प्राणज्योत मालवली. पीडितेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी यासंदर्भातील माहिती पत्रकार परिषद घेवून दिली. दरम्यान, पीडितेचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच हिंगणघाटमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! हिंगणघाटमध्ये तरुणीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न
वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाटमधील नांदोरी चौकात ३ फेब्रुवारीला (सोमवारी) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणीला आरोपी विकी नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे हिंगणघाट हादरून गेले होते. गेल्या सात दिवसांपासून पीडित तरुणीवर नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. घटनेच्या पहिल्या दिवसापासूनच पीडितेची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान तिच्यावर चार वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पीडितेचा रक्तदाब नियंत्रणात नसल्याने तिला श्वसनाला त्रास होत होता. त्यानंतर तिला व्हेंटीलेटरवर ठेवले होते. रविवारी तिच्यावर चौथी शस्त्रक्रीया केल्यानंतरही तिची प्रकृती खालावतच होती. सोमवारी (दि 10) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास पीडितेला ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर डॉक्टर तिच्यावर उपचार करत असताना सकाळी 6 वाजून 55 मिनीटांनी तिचा मृत्यू झाला.
हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : महाविद्यालयातील सहकारी अन् विद्यार्थ्यांनी 'ती'ला वाहिली श्रध्दांजली
दरम्यान, पीडितेच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने हिंगणघाटसह पीडितेच्या दरोडा या मुळगावीही पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. पोलीस प्रशासनाचे सर्व वरिष्ठ अधिकारी याठिकाणी पोहोचले असून तिचा मृतदेह गावात येण्यापूर्वी शांतता राखण्याचा आणि लोकांना शांत ठेवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.