नागपूर - हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील सांगला चितकुल मार्गावर रविवारी दरड कोसळण्याची घटना घडली. यावेळी भूस्खलनामुळे पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हल्सवर मोठी दरड कोसळली. या वाहनात राजस्थान, महाराष्ट्र आणि दिल्लीतील पर्यटकांचा समावेश होता. यात नागपूरच्या प्रतीक्षा पाटील या तरुणीसह 9 पर्यटकांचा मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. यात इतरांवर उपचार सुरू आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आलेली यादी हे सर्व पर्यटक दिल्ली येथून हिमाचल प्रदेशात सहलीला गेले होते. दरम्यान हिमाचल प्रदेशातील किन्नोर जिल्ह्यात घडलेल्या घटनेत जवळपास 11 पर्यटक होते. या मिनीबसमध्ये नागपूर जिल्ह्यातील पाटण सावंगी येथील प्रतीक्षा पाटील यांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेत मृतकांमध्ये चार महिला असून या अपघातात राजस्थानच्या एकाच कुटुंबातील तिघांचा ही मृत्यू झाला आहे. प्रतीक्षा पाटील यांच्या आधारकार्डवर हा पत्ता मिळाला असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. यात टाकळी भन्साळी येथील सासर असल्याचे पुढे येत आहे. यामध्ये त्या मागील चार वर्षांपासून मध्यप्रदेशात राहत असल्याची माहिती पुढे आली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आलेल्या यादीत 27 वर्षीय प्रतीक्षा पाटील यांचे नाव असल्याचे सांगितले जात आहे.