नागपूर - जिल्ह्यात पावसाने आधी दडी मारली होती. मात्र, गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. उमरेड तालुक्यातील शेडेश्वर धरणाचे दरवाजे उघडल्याने नांद नदीला पूर आला आहे. यात शेतीचे मोठे नुकसान झाले. नदीलगतच्या शेतामध्ये पुराचे पाणी गेल्याने सर्व पीक नष्ट झाले आहे.
नागपूर विभागात सरासरी 55.58 मिमी पाऊस झाला आहे. पावसाळ्याचा दीड महिना कोरडा गेल्यानंतर गेल्या 4 दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. नागपूर जिल्ह्यात भिवापूर तालुक्यामध्ये 139 .10 मिमी पाऊस झाला आहे. तर, उमरेड तालुक्यात 135.30 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय हिंगणा मौदा कुही तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळे नदी नाले तुडुंब भरलेले आहेत.
उमरेड तालुक्यातील नांद नदीला पूर आल्याने आजूबाजूला असलेले छोटे नालेसुद्धा भरून वाहायला लागले आहेत. पुराचे पाणी गावात आणि शेतकऱ्यांच्या शेतात शिरले आहे. ज्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. दीड महिन्यापासून कसे बसे जगवलेले पीक नष्ट होत आहे.