नागपूर - हलबा क्रांती सेनेच्या कार्यकर्त्यानी मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांच्या घरासमोर आदिम वेशभूषा धारण करून नृत्य केले. हलबा समाजाची आदिवासी श्रेणीमध्ये आरक्षणाची मागणी आहे. त्यासाठी हलबा समाजाने आदिवासी वेशभूषेत आंदोलन केले.
हलबा समाजाचा दावा आहे की, हलबा समाज विदर्भात 240 वर्षांपासून वास्तव्यास असल्याचे आणि आदिम संस्कृतीचे पालन करत असल्याचे दस्तावेज आणि पुरावे आहेत. ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाबद्दल विस्तृत अभ्यास करून अहवाल तयार केले, तसेच हलबांच्या बाबतीत करावे. त्यासाठीच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी हलबा क्रांती सेनेच्या कार्यकर्त्यानी मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांच्या घरासमोर आदिम वेशभूषा धारण करून नृत्य केले. सर्वात महत्वाचे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हलबा समाजाच्या मागण्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यासंदर्भात त्यांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देखील दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हलबा समाजाला एसटी मध्ये समाविष्ट संदर्भात दिलेल्या आश्वासनाला 4 वर्ष पूर्ण झाले आहेत. या 4 वर्षांत मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन न पाळल्याने संतापलेल्या हलबा क्रांती सेनेच्या कार्यकर्त्यानी म्हशीला मुख्यमंत्र्यांची उपमा देत म्हशीच्या कानात पुंगी वाजवून आंदोलन केले होते.