नागपूर : वेध शाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार नागपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्याला अवकाळी, वादळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला आहे. गुरूवारी संध्याकाळी अचानक वातावरणात बदल झाला. सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात ठिकठिकाणी गारपीट झाली आहे. सुमारे एक तास वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस सुरू होता. ज्यामुळे रस्त्यावर राहणाऱ्या अनेकांचे अतोनात हाल झाले आहेत.
सुरक्षा भीती घरावर कोसळली : शहरातील सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीत जेपी टाऊन आहे. या टाऊनच्या सुरक्षा भिंतीला लागून अशोक यांचे घर आहे. गुरूवारी मुसळधार पाऊस सुरू होताच सुरक्षा भिंत यादव यांच्या घरावर कोसळली. त्यावेळी घरात अशोक यादव यांची पत्नी ज्योती आणि मुलगा अमन होते. या घटनेत अमन आणि त्याची आई ज्योतीचा मृत्यू झाला आहे, तर अशोक आणि एक मुलगा घराबाहेर असल्याने ते बचावले आहेत.
हवामान विभागाचा इशारा : गुरूवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर शहरातील अनेक भागात झाडे उन्मळून खाली पडली आहेत. अनेक झाडे वाहनांवर पडल्याने वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
गुरुवारपासून विदर्भात पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा धोका असल्याचा अंदाज नागपूर वेधशाळेकडून व्यक्त केला होता. विंड डिसटॅबन्समुळे बंगालच्या उपसागरात अँटीसायक्लोनिक परीस्थिती तयार झाली आहे. त्यामुळे विदर्भातील अनेक भागात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पुढील पाच दिवस सुरू राहणार आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान : गेल्या दोन महिन्याच्या काळात विदर्भात अनेक वेळा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ज्यावेळी विदर्भात प्रखर ऊन पडते, त्यावेळी वारंवार अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतीपिकांची नासाडी झाली आहे. वेधशाळेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील पाच ते सात दिवस विदर्भातील अनेक भागात पाऊसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही, तर या पाच दिवसात विदर्भातील तापमानात किमान तीन ते चार डिग्री तापमानात घट होईल, असा अंदाज नागपूर वेधशाळेचे संचालक मोहनलाल शाहू यांनी व्यक्त केला आहे.
बंगालच्या उपसागरात अँटीसायक्लोनिक : बंगालच्या उपसागरात अँटीसायक्लोनिक स्थिती निर्माण झाली आहे. तेथून येणाऱ्या आद्रता वाऱ्यामुळे तापमानात घट झाली असल्यामुळे अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. उद्यापासून हवामानात बदल होईल. तापमानात घट नोंदवण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. गेल्या दोन महिन्यात अनेक वेळा विदर्भाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले होते. त्यानंतर आता पुन्हा विदर्भावर अवकाळीचा धोका आहे. उद्यापासून पुढील पाच ते सात दिवस विजेच्या कडकडाटसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे.