नागपूर - शहरासह जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली. गुरूवारी सकाळपासून नागपूर शहरात मेघगर्जनेसह पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी गारांसह पाऊस झाला. मागील चार दिवसापासून होणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अवकाळी पावसामुळे हरभरा, तूर, गहू, कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील मोहपा, पिपळा, किनखेडे गावात गुरूवारी पहाटे गारपीट झाली. पावसामुळे तापमानात प्रचंड घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. नागपूरमधील गुरुवारचे किमान तापमान हे 12.3 अंश सेल्सियस इतके नोंदवण्यात आले. गुरूवारी सकाळपर्यंत शहरात 13.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
हेही वाचा - अमरावती जिल्ह्याला अवकाळी पावसासह गारपीटीचा जोरदार तडाखा
वातावरणातील दृश्यता (व्हिजिबीलीटी) 200 ते 500 मीटरवर आली आहे, याचा फटका विमान सेवेवर पडू शकतो. येत्या 24 तासात नागपूर जिल्ह्यासह विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.