नागपूर - ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या ७५ वर्षीय उमेदवाराचे अपहरण करून त्याला अर्ज मागे घेण्यास बळजबरी करण्याची घटना नागपूरच्या हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. रामभाऊ पवार असे या ७५ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी चौघांनी रामभाऊ यांना बळजबरीने कारमध्ये बसवून अपहरण केले. यानंतर अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
पेठ ग्रामपंचायत सदस्यासाठी निवडणूक होणार आहे. याकरिता ७५ वर्षीय रामभाऊ पवार यांनी उमेदवारी अर्ज सादर केला होता. काही व्यक्तींनी त्यांचे अपहरण करून त्यांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्यामुळे निवडणूक अविरोध झाली आहे. अर्ज मागे घेतल्यानंतर आरोपींनी रामभाऊ यांची सुटका केली. त्यानंतर रामभाऊ यांनी थेट हिंगणा पोलीस ठाण्यात जाऊन या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बाल्या, दीपक, पुरुषोत्तम व मनोहर येलेकर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने जामिनावर आरोपींची सुटका केली आहे.
हेही वाचा - 'काँग्रेस नेत्यांची हुशारी बघा...! शेतीतून 'इनकम' दाखवून 'टॅक्स' वाचवतात'
चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
रामभाऊ सर्वेलाल पवार (वय ७५) असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. त्यांनी पेठ गटग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत नागपूर ग्रामीण तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर केला होता. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार सोमवारी सकाळी १० वाजता एका आरोपीने त्यांना निवडणूक चिन्ह घेण्यासाठी घरून नेले. त्यानंतर धामना या गावात आरोपीच्या आणखी तीन साथीदारांनी रामभाऊ यांना दारू पाजली. तेथून थेट नागपूर ग्रामीण तहसील कार्यालयात नेऊन उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला. त्यानंतर त्यांना दूर नेऊन सोडून दिले. त्यानंतर पीडित रामभाऊ यांनी हिंगणा पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दिल्यानंतर हिंगणा पोलिसांनी आरोपी बाल्या बावणे, दीपक करवा, पुरुषोत्तम सोनवणे सर्व रा पेठ व मनोहर येलेकर (रा. धामना) या चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पेठ ग्रामपंचायत निवडणूक अविरोध
रामभाऊ यांनी पेठ ग्रामपंचायत निवडणुकीतून अचानक माघार घेतल्यामुळे निवडणूक अविरोध झाली आहे. या संदर्भात आता तक्रार दाखल झाल्याने हे प्रकरण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता या प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
हेही वाचा - परभणीच्या अंध युवतीकडून कळसुबाई शिखर सर!