नागपूर - नवऱ्याच्या अनैतिक संबंधाला कंटाळून एका महिलेने आईच्या मदतीने नवऱ्याच्या प्रेयसीचा काटा काढल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पिंकी उर्फ पूजा वखारीया असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, पूजाच्या हत्येच्या आरोपाखाली कळमना पोलिसांनी भोजराज सहारे, त्याची पत्नी ज्योत्यशी सहारे आणि तिची आई प्रमिला जैन तभाने या तिघांना अटक केली आहे.
या हत्याकांडमागील कहाणी अशी, की भोजराज सहारे याचे त्याचाच वस्तीत राहणाऱ्या पूजा उर्फ पिंकी वखारिया या विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. त्यांच्या या नात्याची माहिती भोजराजच्या पत्नीला समजली होती. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून भोजराज आणि ज्योत्यशी यांच्यात वाद सुरू होता. नवऱ्याचे घराबाहेरील अनैतिक संबंध संपवावेत याकरता ज्योत्यशीने अनेक प्रयत्न केले. मात्र, तिला कोणतेही यश मिळत नसल्याने अखेर तिने पूजाला गाठून तिलासुद्धा नवऱ्याच्या दूर राहण्याची विनंती केली. मात्र, भोजराज आणि पूजा दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर तिचे सर्व प्रयत्न संपले होते.
काहीही करून नवऱ्याला परत आणण्याच्या उद्देशाने ज्योत्यशीने तिची आई प्रमिला जैन तभानेच्या मदतीने पूजाला भेटायला बोलावले. तिथेसुद्धा दोघींनी पूजाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण पूजाने भोजराजशी संबंध तोडण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या ज्योत्यशीच्या आईने पूजाला पकडून ठेवले. त्याचवेळी ज्योत्यशीने सोबत आणलेल्या धारधार शस्त्राने पूजाच्या पोटात सपासप वार केले. अचानक झालेल्या हल्ल्याने जखमी झालेल्या पूजाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यावेळी भोईराज हासुद्धा तेथे उपस्थित होता.
दरम्यान, घटनेची माहिती समजताच कळमना पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले. यावेळी पोलिसांनी पूजा वाखारीयाच्या हत्येप्रकरणी पूजाचा प्रियकर भोजराज सहारे, त्याची पत्नी ज्योत्यशी सहारे आणि तिची आई प्रमिला जैन तभाने या या तिघांना अटक केली आहे.