Aditya Thackeray Nagpur Tour : राज्यात भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर गेल्या काही दिवसात खूप झळकू लागले आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, असो कि सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक बॅनर झळकले आहेत. आता या भावी मुख्यमंत्री बॅनरच्या स्पर्धेत महाविकासआघाडीतील शिवसेनाही उतरली आहे. उद्धव ठाकरे गटातील नागपूरमधील कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरेंच्या नागपूर दौऱ्याआधी भावी मुख्यमंत्रीचे बॅनर लावले आहेत. यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आदित्य ठाकरे उतरलेत का असा सवाल उपस्थित होत आहे.
आदित्य ठाकरेंचा नागपूर दौरा : आदित्य ठाकरे आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात पर्यावरण मंत्री या पदावर राहिले होते. दरम्यान आजच्या या दौऱ्यात आदित्य ठाकरे नांदगाव आणि वराडा या गावांना भेट देणार आहेत. कोराडी वीज प्रकल्पामुळे या गावांना प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. या गावातील नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत.
या नेत्यांचे लागले भावी मुख्यमंत्रीचे बॅनर : राज्यात अनेकांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागत आहेत. या यादीत सर्वात आधी नाव येते राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधीपक्ष अजित पवार यांचे. अजित पवार यांच्या सासरवाडीत आणि मुंबईत, नागपुरात भावी मुख्यमंत्रीचे बॅनर लागले होते. अजित पवार यांनी एका कार्यक्रमात आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे म्हटले होते. त्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या गावात जे अजित पवार यांची सासरवाडी आहे. तेथे त्यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागले होते. नागपुरातील लक्ष्मी भुवन चौकात राष्ट्रवादीचे नेते प्रशांत यांनी भावी मुख्यमंत्री अजित पवार असे बॅनर लावले होते. भावी मुख्यमंत्रीच्या यादीत सुप्रिया सुळे यांचे नाव आहे. मुंबईतील एका चौकात सुप्रिया सुळे यांचे भावी महिला मुख्यमंत्री असे बॅनर झळकले होते. याची माहिती माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला होता. भावी मुख्यमंत्रीच्या यादीत तिसरे नाव अजून एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचे आहे. ते म्हणजे जयंत पाटील. मुंबईतील नेपियन्सी रोडवरील घराबाहेर जयंत पाटील यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले होते. त्यानंतर या यादीत भाजपचे नेते आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव आहे. नागपूरमध्ये फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले होते. आता नागपूरमध्ये आदित्य ठाकरे यांचे बॅनर झळकले आहे.
आदित्य ठाकरेंचे बॅनर : आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागतासाठी नागपूर शहरात बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर आदित्य ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला आहे. रामटेक आणि कान्हन या रस्त्यांवर आणि बसस्थानकांवर भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब, आपले रामटेक विधानसभा मतदारसंघात हार्दिक स्वागत असा मजूकर असलेले बॅनर लिहिला आहे. ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख लोकेश बावनकर आणि उपजिल्हा प्रमुख समीर मेश्राम यांनी हे बॅनर्स लावले आहेत.
हेही वाचा -