नागपूर - हिंगणा एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या नीलडोह येथे एका गृहस्थाने पैसे दिले नाहीत, यावरून निर्माण झालेल्या वादानंतर १५ ते २० तृतीयपंथीच्या टोळीने त्या व्यक्तीच्या घरात तोडफोड करत सामानांची नासधूस केली आहे. एवढंच नाही तर त्यांनी घरात असलेल्या महिला व त्यांच्या मुलाला देखील मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची माहिती समजात पोलिसांनी सर्व तृतीयपंथीयांना ताब्यात घेतले.
जबरदस्ती घरात घुसून तृतीयपंथीयांची मारहाण
अंकुश हरिभाऊ मुनेश्वर आणि त्याची आई घरी असताना काल ३-४ तृतीयपंथींनी श्रावण महिना असल्याचे निमित्त सांगून वर्गणी गोळा करायला सुरुवात केली. अंकुश यांनी त्यांना वर्गणी दिली नाही. त्यावरून वाद निर्माण झाला. मात्र आज परत १५ ते २० तृतीयपंथी ऑटोरिक्षाने अंकुशच्या घरी दाखल झाले आणि शिवीगाळ करत घरात घुसले. त्यांनी अंकुशच्या घरातील टीव्ही, फ्रीज आणि इतर वस्तूंची तोडफोड केली. एवढ्यावर न थांबता त्यानी अंकुश व त्याच्या आईलासुद्धा मारहाण केली. हा सगळा गोंधळ पाहून गावकरी जमा झाले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
तृतीयपंथी पोलिसांच्या ताब्यात -
घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार उमेश बेसरकर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गोंधळ घालणाऱ्या सर्व तृतीयपंथींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.
तृतीयपंथींचीही मारहाणीची तक्रार
या प्रकारानंतर पोलीस उपायुक्त नरुल हसन सुद्धा पोलीस ठाण्यात दाखल झाले. तृतीयपंथींनी देखील अंकुशने मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा - राज ठाकरे नक्की नातू कोणाचे, प्रबोधनकारांचे की पुरंदरेंचे? हर्षल बागलांचा सवाल