नागपूर : पहिली घटना नवीन कामठी पोलीस स्टेशनमध्ये घडली आहे. कर्तव्यावर असताना चार पोलीस कर्मचारी पोलीस स्टेशनचे काम सोडून शेजारी असलेल्या पोलीस कर्मचारी क्वार्टरमध्ये जुगार खेळत बसले होते. रात्री दीडच्या सुमारास सहायक पोलिस आयुक्त थोरबोले हे रात्रपाळी ड्युटीवर असल्याने त्यांनी पोलीस ठाण्याला भेट दिली. तेव्हा चार कर्मचारी कर्तव्यावर हजर नव्हते. त्यामुळे त्यांनी चौघांच्या संदर्भात विचारणा केली. तेव्हा ते चारही कर्मचारी शेजारच्या इमारतीत जुगार खेळत असल्याची माहिती त्यांना समजली. त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन शहानिशा केली. तेव्हा चारही कर्मचारी मद्यसेवन करत जुगार खेळताना दिसून आले. त्यानंतर सहायक पोलिस आयुक्त थोरबोले यांच्या आदेशाने चौघांना निलंबित करण्यात आले आहे.
दुसरी घटना : ही नागपूर विद्यापीठाच्या समोर घडली आहे. वाहतूक पोलीस लाच घेताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. नागपूरच्या संत तुकडोजी महाराज चौकात कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक पोलिसाचा नियम तोडणाऱ्या एका सरकारी महिला कर्मचाऱ्याकडून लाच स्वीकारताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. त्यानंतर पोलीस उपायुक्त चेतना तिडके यांनी पोलिस कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबित केले आहे.
300 रुपयांची लाच : ही घटना मंगळवारी घडली. तुकडोजी चौकात काही वाहन चालकांना थांबविले होते, त्यात संबंधित सरकारी महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. त्यांनी हेल्मेट घातले नव्हते. पोलिसांनी त्यांना चालन करण्याची तंबी देऊन 300 रुपयांची लाच मागितली. दरम्यान एका दुसऱ्या व्यक्तीने त्यांचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर वायरल केला. 27 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये वाहतूक पोलीस व सरकारी महिला कर्मचारी चालनबाबत चर्चा करताना दिसत आहेत.
संभाषण व्हिडीओमध्ये रेकॉर्ड : महिला म्हणते की, तुम्ही चलन करतो म्हणता आहात आणि तीनशे रुपये देखील मागत आहात. तुम्हाला तीनशे रुपये हवे आहेत, तर चलान रद्द करतो असे म्हणा. यावर पोलीस म्हणतो, तुम्ही पैसे द्या मी काहीच करीत नाही, मी चलानची प्रत काढली नाही, मी केवळ गाडीचा नंबर टाकला आहे. तर महिलाही म्हणते मी, तुमच्यासारखीच सरकारी कर्मचारी आहे, तुम्ही चुकीचे वागत आहात. हे संपूर्ण संभाषण व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झाले आहे.
हेही वाचा : Vishal Dhume Suspended : सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे निलंबित