नागपूर : भारतात आलेल्या परदेशी पाहुण्यांनी पर्यटन करीत पेंच व्याघ्र प्रकल्पात अनेक वन्यजीवांचे दर्शन घेतले. जल, जमीन, जंगलाशी एकरूप असणाऱ्या भारतीय संस्कृतीचे दर्शन या पर्यटन यात्रेत झाले. वन व वन्यजीव संवर्धनासंदर्भात शासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी घेतली. वाघांची संख्या वाढवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचीही त्यांनी दखल घेतली.
अतिरिक्त जिल्हाधिकारींकडून प्रतिनिधींचे स्वागत : जी-20 चा गत आयोजक देश इंडोनेशियाचे सी-20 शेरपा, माफ्तुचान, सी-20 ट्रायका सदस्य ब्राझीलच्या अलेसेंड्रा निलो, भारताचे सी-20 शेरपा विजय नांबियार यांच्यासह सी-20 प्रतिनिधींनी आज सकाळी पेंच व्याघ्र प्रकल्पास भेट दिली. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक लक्ष्मी, उपसंचालक प्रभुनाथ शुक्ला, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण यांनी या प्रतिनिधींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.

अनेक पक्षी आणि प्राण्यांचे दर्शन : स्वागतानंतर जंगल सफारीला सुरुवात झाली. येथील पानझडी जंगलात पेंच नदी, तोतलाडोह ओढा, पेपडी कुंड, हत्तीगोटा, राणीडोह मार्गे सुरू झालेल्या प्रवासात अर्जुन, धावडा, तेंदू, भेरिया, अन् वृक्षांचे दर्शन घडत होते व या वृक्षांविषयी गाईड माहिती देत होते. प्रवासात कोल्ह्यांची सुंदर जोडी, हरणांचे कळप, मोर, सांबर, रानकोंबड्या आदी प्राण्यांनी दर्शन दिले. ग्रे हॉर्नबिल, रूपर्ड ट्रिपॉय, रुडीसल डक, ब्लॅक स्टार्क आदी पक्षांचेही दर्शन घडले.

वाघाच्या जोडीने दिले दर्शन : पेंच येथील जंगलातील बांबुवनातून जाताना वाघाच्या जोडीचे दर्शन घडले. या दर्शनाने व्याघ्र प्रकल्पातील भेट सफल झाल्याच्या भावना सी-20 च्या प्रतिनिधींच्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसून आल्या. तोतलाडोहच्या बॅक वॉटर परिसरातून या जंगल सफरीच्या परतीचा प्रवास सुरू झाला. जंगलातील प्राण्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या बचाव मोहिमेची माहिती देण्यासाठी येथे स्टॉल्स उभारण्यात आले होते. या स्टॉल्सला भेट देऊन प्रतिनिधींनी माहिती घेतली.

परदेशी पाहुण्यांनी केले गुढी पूजन : पेंच प्रकल्पातील आगमनानंतर गुढीपाडव्याचे औचित्य साधत प्रकल्प कार्यालय परिसरात उभारण्यात आलेल्या सुंदर गुढीचे प्रातिनिधिक स्वरूपात पाहुण्यांनी पूजन केले. भारतीय संस्कृतीचे हे विलोभनीय दृश्य आणि आतिथ्य पाहून परदेशी पाहुणे चांगलेच भारावून गेले.
