नागपूर Flood Situation Nagpur : नागपुरात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळं शहरातील अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती उद्भवली होती. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतलाय. या दरम्यान त्यांनी अंबाझरी ओव्हरफ्लो पॉईंट, डागा लेआऊट, शंकर नगर, सीताबर्डी, नंदनवन चौक, समता नगर, नंदाजी नगर, भुतेश्वर नगर, वर्मा ले-आऊट या भागांमधील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देखील दिल्या आहेत.
आढावा बैठक : नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे व नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या उपस्थितीत एक आढावा बैठक घेतलीय. या परिस्थितीला कारणीभूत तांत्रिक बाबींचा विचार करून भविष्यात त्या टाळण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीम तैनात : या पावसामुळं तिघांचा मृत्यू झाला झालाय. शहराला अजूनही ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीमची तैनाती कायम ठेवण्यात आलीय. 4 तास झालेल्या मुसळधार पावसानं आणि 2 तासात 90 मिमी पाऊस झाल्यानं अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. नागनदी, पिवळी नदी लगतच्या परिसरात पाणी शिरलंय. यामुळे रस्ते, पुलांचं नुकसान झालंय. नाल्याजवळच्या भिंती पडल्या. घरात पाणी शिरलं. त्यामुळं नागरिकांचं नुकसान झालंय.
शहराला ऑरेंज अलर्ट : सुमारे 10 हजार घरांमध्ये पाणी शिरल्याचा प्रारंभिक अंदाज आहे. त्यांना तातडीची मदत 10 हजार रुपये देण्यात येईल. गाळ काढण्यासाठी राज्य सरकार निधी देईल. जेथे दुकानांची क्षती झाली, त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत मदत देणार आहे. टपरी व्यवसायिकांना नुकसानीसाठी 10 हजारापर्यंत मदत देण्यात येईल. शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आल्यानं सर्व टीमची तैनाती कायम ठेवण्यात आलीय. पोलीस विभाग सुद्धा सज्ज आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
लोकांना बाहेर काढण्याचं काम : आज या स्थितीनंतर वीज बंद करण्यात आली होती. ती बहुतेक ठिकाणी पुन्हा सुरू करण्यात आलीय. 14 ट्रान्सफॉर्मर अजून सुरू केलेले नाहीत. कारण, तेथे पाणी कमी होण्याची वाट पाहिली जात आहे. तेथे ओलावा कायम आहे. कुठलाही अनर्थ होऊ नये, म्हणून वीज बंद आहे. सकाळपर्यंत ती सुरू करण्यात येईल, अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. पहिल्या तीन तासातच लोकांना बाहेर काढण्याचं काम प्रशासनानं केलंय. एनडीआरएफ, एसडीआरएफचा यात मोठा वाटा आहे. रिस्पॉन्स टाईम हा चांगला होता. त्याचं कौतूक केलं पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
हेही वाचा :