नागपूर - दोन दिवसांची उसंत दिल्यानंतर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. उमरेड तालुक्यातील पिपळा या गावात पुराचे पाणी शिरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चार दिवसांपूर्वी नांद-शिडेश्वर धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आले होते, ज्यामुळे अनेक गावांमध्ये पूर आला होता. आता धरणाचे आणखी 5 दरवाजे उघडण्यात आल्याने नांद, पिपळा यांसह नदीकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे.
नांद-शिडेश्वर धरणात क्षमतेपेक्षा जास्त पाण्याचा साठा उपलब्ध झाल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे १२ दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. सुदैवाने यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. तरी नागरिकांच्या घरात पुराचे पाणी गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच या पूरामुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे.