नागपूर - महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण गंटावार व त्यांची पत्नी डॉक्टर शैलू गंटावार यांच्या विरुद्ध अपसंपदा जमवल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदवला आहे. पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी चारच दिवसांपूर्वी नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण गंटावार व त्यांची पत्नी डॉक्टर शैलू गंटावार यांना निलंबित करण्यात आले होते.
नागपूर पालिकेच्या तब्बल 5 दिवस चाललेल्या मॅरेथॉन सर्वसाधारण सभेत जेष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी डॉक्टर गंटावार दाम्पत्याच्या गैरकारभाराचा पाढा वाचला होता. त्यानंतर महापौरांनी चौकशीचे निर्देश देत पुढील आदेशपर्यंत निलंबित करण्याचे आदेश दिले होते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे डॉ. प्रविण मधुकर गंटावार व त्यांची पत्नी डॉ. शिलु प्रविण गंटावार यांनी आपल्या लोकसेवक पदाचा गैरवापर करून अपसंपदा जमवली असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर एसीबीने केलेल्या तपासात अनेक धक्कादायक तथ्य समोर आले आहे. ज्यामध्ये आपल्या लोकसेवक पदाचा गैरवापर करत गंटावार दाम्पंत्याने 2 कोटी 52 लाख रुपयांची अवैध माया जमवली आहे. शासनाने त्यांना दिलेल्या पगाराच्या एकूण वैध उत्पन्नाच्या ४३.०६ टक्के जास्त अपसंपदा जमवली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरूध्द सिताबर्डी पोलीस स्टेशन नागपूर शहर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.