नागपूर - गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल ५७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आता नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७७५ इतकी झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये मोमीनपुरा, नाईक तलाव, बांगलादेश, जरीपटका, टाकळी आणि हिंगणा येथील व्यक्तींचा समावेश आहे.
महत्त्वाचे म्हणजे यापैकी बहुतांश रुग्ण एकट्या नाईक तलाव आणि बांगलादेश परिसरातील आहे. या सर्व रुग्णांना प्रशासनाने आधीच क्वारंटाईन केले होते. गेल्या महिन्यात नागपुरातील कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग मंदावला होता. मात्र, या महिन्याच्या सुरुवातीलाच अचानक रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. यामुळे, प्रशासनाची चिंतादेखील वाढली आहे.
आज दिवसभरात नागपुरातील ११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आता जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची एकूण संख्या ४९५ झाली आहे. तर आतापर्यंत १५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. सध्या २६५ रुग्णांवर मेयो आणि मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.