नागपूर Extortion Money from Judge : युट्युब चॅनलच्या कथित पत्रकाराच्या मदतीनं जीएसटी निरीक्षकानं चक्क न्यायाधीशांकडे १५ लाखांची खंडणी मगितल्याची धक्कादायक घटना नागपूरात घडली. न्यायाधीशानांकडे खंडणी मागितल्याचा प्रकार घडल्यानं जिल्ह्यासह परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी न्यायाधीशांनी नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. न्यायाधीशांनी दाखल केलेल्या तक्रारी आधारे पोलिसांनी जीएसटी निरीक्षक राजकुमार दिवटे तसंच कथित पत्रकार प्रकाश गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खंडणीच्या गुन्ह्यात दोन वर्षांच्या शिक्षेचं प्रावधान असल्यानं पोलिसांनी दोन्ही आरोपींना नोटीस देऊन सोडल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली आहे.
पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मेंढे यांनी सांगितलं की, पोलिसांनी विक्रीकर विभागाचे निरीक्षक राजकुमार दिवटे, त्याचा साथीदार प्रकाश गायकवाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३८५ (खंडणी) आणि इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे.
न्यायाधीशांना धमकी : या प्रकरणात जीएसटी निरीक्षक राजकुमार दिवटे गेल्या चार वर्षांपासून नागपूरात कर्तव्यावर आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिवटे यांची अमरावती येथे बदली झाली होती. बदली रद्द करण्यासाठी राजकुमार दिवटे यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आलं नाही. तेव्हा त्यांनी न्यायाधीश रमेश जैद यांना बदली रद्द करण्याची विनंती केली. मात्र, त्यांनीदेखील मदत न केल्यामुळं चिडलेल्या दिवटे यांनी न्यायाधीशांच्या मोबाईलवर मेसेज केला. तुमच्यामुळं माझं १५ लाख रुपयांचं नुकसान झालं असून त्याची भरपाई तुम्हाला करावी लागेल. अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकी दिली होती.
कथित पत्रकाराच्या मदतीने दिली धमकी : यावरदेखील न्यायाधीश रमेश जैद आपल्याला दाद देत नसल्यानं राजकुमार दिवटे यांनी तथाकथित पत्रकाराच्या मदतीनं न्यायाधीशांना धमकवण्याचा प्रयत्न सुरू केला. अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात राजकुमार दिवटे आणि तथाकथित पत्रकाराविरुद्ध तक्रार दाखल केलीय. पोलिसांनी दोघांची चौकशी केल्यानंतर सूचनापत्र देऊन सोडलं आहे. न्यायाधीशांकडे खंडणी मागितली जात असेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. यापूर्वी देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करुन खंडणी मागितल्याचा प्रकार घडला होता.
हेही वाचा -