नागपूर - मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका चारचाकी वाहनात स्फोटके आढळून आली होती. ती स्फोटके नागपुरातील एका कंपनीकडून निर्मित असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यात सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या या नागपूर जिल्ह्यातील सोलार कंपनीत बनवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. पण या नेमक्या कश्या पद्धतीने तिथे पोहोचल्या याचा शोध मुंबई क्राइम ब्रांच घेत आहे.
बॉक्सवर जिलेटीनची माहिती असते उपलब्ध-
या स्फोटकांची विक्री ही बॉक्समध्ये केली जाते. या 25 किलोच्या बॉक्समध्ये साधारण 200 कांड्या असतात. या बॉक्समध्ये त्या स्फोटकांची निर्मिती दिनांक, एक्सपायरी, बॅच कोड यासह बारकोड अन्य माहिती बॉक्सवर लिखित स्वरूपात असते. पण एकदा बॉक्स फोडल्यानंतर मात्र या सगळ्याची माहिती सांगणे कठीण आहे. यामुळे ते जिलेटीन कोणाकडून बाहेर आले हे सांगणे कठीण जाते.
कंत्राटदार कंपनींना हे जिलेटीन विकत घेण्यापूर्वी त्यांना चीफ कंट्रोलर ऑफ एक्सप्लोजिव्ह यांची परवानगी घ्यावी लागते. त्यांनतर डिस्पॅच करताना एक फॉर्म भरला जातो. ज्यामध्ये या बॉक्सची माहिती असते. ही सगळी माहिती डिपार्टमेंट ऑफ एक्सप्लोजिव्ह आणि जवळचे पोलीस स्टेशन यांना दिली जाते. यासह ज्या ठिकाणी पोहोचणार असते तेथील पोलीस अधीक्षक कार्यलयांना ही माहिती ऑनलाइन आणि ऑटोमॅटिक पद्धतीने पाठवण्याची व्यवस्था असते.
तर कांड्याचा स्फोट होत नाही-
या कारटेजला(जिलेटिन कांड्या) चार्ज करणार ब्लास्टर डिव्हाईस लागतो. ते नसल्यास या कांड्याचा स्फोट होत नाही. या कापल्या किंवा जाळल्यातरी याचा परिणाम होत नसल्याची माहिती सोलार एक्सप्लोजिव्ह लिमिटेडचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांनी माध्यमांना दिली. कंपनीकडून ज्या विक्रेत्यांना हे परवानाधारक यांना विकले जाते याचा रेकॉर्ड असतो. विकल्यानंतर यातील एखाद्या व्यक्तीकडून व्यावसायिक, कंत्राटदार यांच्याकडून याचा गैरवापर झाला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
जिलेटिन कांडीचा उपयोग कशासाठी होतो...
या जिलेटिन कांड्याचा साधारण उपयोग हा विहीर फोडणे, दगडाच्या खाणी, मॅगनीज खाणी, WCL मेगास्ट्रक्चरमध्ये ब्लास्टिंगसाठी केला जातो. याची टेंडर प्रोसेसिंग असते. याचा परवाना असणाऱ्यांना प्रत्यकेवेळी याची माहिती डिपार्टमेंट ऑफ एक्सप्लोजिव्ह यांना देऊन परवानगी घ्यावी लागते.
मुंबई क्राईमब्रँचकडून झाली विचारणा....
या संदर्भात स्फोटकाची माहिती पुढे येताच मुंबई क्राईमब्रँचकडून यावर विचारपूस करण्यात आली आहे. याचा सर्व डाटा हा उपलब्ध आहे. याबद्दल माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.