नागपूर- राज्यात कोरोना संसर्ग वाढत असून दररोज 20 हजारांहून जास्त रुग्ण आढळत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना उपचार सुरु असताना ऑक्सिजनची गरज लागते. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे विविध जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. नागपूरमध्ये सध्याच्या गरजेपेक्षा जास्त ऑक्सिजनची निर्मिती होत असल्याची माहिती निवासी जिल्हाधिकारी रवींद्र खाजानजी यांनी दिली आहे. नागपूरमधून इतर जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे.
मुंबई, पुणे नंतर आता उपराजधानी नागपूर आता कोरोनाचा नवा हॉटस्पॉट म्हणून समोर आलेला आहे. नागपुरात दर दिवसाला दोन हजारांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. सध्या नागपूर जिल्ह्यातील ६० ठिकाणी सुमारे ५७८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ५८८८ रुग्ण गृह विलागीकरणात राहून स्वतःवर उपचार करून घेत आहेत.
मेयो आणि मेडिकल रुग्णालयाकडे स्वत:चे ऑक्सिजन प्लांट
मेयो आणि मेडिकल रुग्णालयासह अनेक खासगी रुग्णालयांमध्ये गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असल्याने त्यांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची नितांत गरज असते. राज्यात रुग्ण संख्या वाढत असताना नागपुरात रुग्णांची संख्या दुपटीने वाढली असला तरी अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला नाही. मात्र, नागपुरात मुबलक प्रमाणात ऑक्सिजनचे उत्पादन होत असल्याने सध्यातरी अशी परिस्थिती उद्धावलेली नाही. मेडिकल आणि मेयो रूग्णालयांकडे स्वतःचे लिक्विड ऑक्सिजन प्लांट असल्यानेच नागपूर वरील भार मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे.
वाढत्या कोरोना संक्रमण काळात नागपुरात ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळे रोज उत्पादित होत असलेल्या ऑक्सिजन पैकी ८० टक्के ऑक्सिजन मेडिकल वापरासाठी आरक्षित करण्यात आला आहे. २० टक्के ऑक्सिजन साठा औद्योगिकक्षेत्रासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. नागपूरमध्ये सध्या दर दिवसाला सात हजार सिलेंडरची मागणी होत आहे. नागपुरात सध्या १२० मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन घेतले जात आहे. शिवाय ९७ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचे उत्पादन देखील नागपूरच्या औद्योगिक क्षेत्रात घेतले जाते.
नागपूरमधून ५ जिल्ह्यांना ऑक्सिजन पुरवठा
नागपूरची सध्याची गरज ही ५० मेट्रिक टन ऑक्सिजनची असली तरी उर्वरित ऑक्सिजन २० मेट्रिक टन ऑक्सिजन नागपूर विभागातील पाच जिल्ह्यांना पुरवले जाते. एवढेच नाही तर नागपूर विभागा बाहेरील अमरावती, यवतमाळ, अकोला आणि नांदेल जिल्ह्याला सुद्धा नागपुरातूनच ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.
नागपूर येथील ऑक्सिजन उत्पादकांपैकी एक असलेल्या आयनॉक्स, आदित्य ऑक्सिजन कंपनीला लिक्विड ऑक्सिजनसाठी भिलाई येथील प्लांटच्या भरवशा वर राहावे लागत आहे. भविष्यात या पेक्षाही भीषण परिस्थिती निर्माण झाल्यास विभागाबाहेरील इतर जिल्ह्यांना होणारा ऑक्सिजन पुरवठा थांबवून इंदोर आणि भिलाई येथून ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्याची तयारी आल्याचे देखील प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.