नागपूर - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी ज्याप्रकारे कारवाई करायला पाहिजे, ती होताना दिसत नाही, त्यामुळे पोलीस कुठल्या दबावात आहे का, असा प्रश्न निर्माण होतो, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच याप्रकरणी पोलिसांनी सुमोटो कारवाई करायला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
क्लिपमधील आवाज कोणाचा आहे, हे सर्वांनाच माहिती -
पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केल्यानंतर सोशल मीडियातून कथितरित्या या प्रकरणाशी संबंध असलेल्या काही ऑडियो क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. यानंतर कथितरित्या राज्य सरकारमधील एका मंत्र्याचे नाव या प्रकरणाशी जोडले गेले. यावर बोलताना, या क्लिपमधील आवाज कोणाचा आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु पोलिसांनी यासंदर्भात खुलासा करायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आश्वासन -
पूजा चव्हाणने हडपसरमधील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती. यानंतर कथितरित्या राज्य सरकारमधील एका मंत्र्याचे नाव या प्रकरणाशी सोशल मीडियातून जोडले गेले. विरोधकांनी हे प्रकरण उचलून धरत सखोल चौकशीची मागणी केली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चौकशीचे आश्वासन दिले आहे.
हेही वाचा - VIDEO : चेन्नई कसोटीत पंत-स्टोक्समध्ये जुंपली...चाहत्यांनी केली घोषणाबाजी