नागपूर - आज (दि. 5 जून) जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना नागपुरात पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि आप पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित येऊन अजनी-वन वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. देशातील पहिला इंटर मॉडल स्टेशन नागपूरच्या अजनी भागात बनणार आहे. त्यासाठी 44.4 एकरमधील 40 हजारांहून जास्त झाडांची कत्तल केली जाणार आहे. याविरुद्ध पर्यावरण प्रेमी संघटना एकत्र झाल्या असून 'सेव्ह अजनी वन'चा नारा देत चिपको आंदोलन केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे नागपुरातील अजनी येथे इंटर मॉडल स्टेशन हब निर्माण होणार आहे. या संपूर्ण कामासाठी हजारो झाडांची कत्तल होणार आहे. ही वृक्षतोड होऊ नये यासाठी आम आदमी पक्षाने हे आंदोलन केले. अजनी भागातील रेल्वे-मेन्स शाळेजवळ आम आदमी पक्षच्या वतीने हातात अजनीवन वाचविण्यासाठी फलक हातात घेऊन 'चिपको आंदोलन' करण्यात आले.
प्रकल्प शहराबाहेर स्थलांतरीत करा
अजनी वन शहराच्या मध्यवर्ती भागात असून शहराच्या ऑक्सिजनची गरज भागवते अशावेळी विकासाच्या नावावर इतक्या मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करणे योग्य नसल्याचे मत आम आदमी पक्षाचे संयोजक देवेंद्र वानखेडे यांनी व्यक्त केले. हा प्रस्तावित इंटर मॉडल स्टेशन हब नागपूर शहराच्या बाहेर घेऊन जावा आणि शहरातील झाडे, वनसंपदा ही सुरक्षित ठेवावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
हेही वाचा - निवासी डॉक्टरांचे आंदोलन अखेर मागे, डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी झाली चर्चा