नागपूर - महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवारांनी शुक्रवारी विधिमंडळांत मांडला. सरकारच्या बाजूने हा अर्थसंकल्प समाधानकारक आहे. करदात्यांमध्ये प्रत्येक विभागातील व्यक्तीचा वाटा असतो. त्यामुळे प्रत्येक विभागातील, शिक्षण, आरोग्य, महिला बालविकास, पर्यटन या सगळ्या बाबींचा विचार करत अर्थमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प मांडला. यात सरकारने कोकणाकडे विशेष लक्ष घातलं मात्र विदर्भाला दुर्लक्षित केल्याचे मत अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी व्यक्त केले.
ठाकरे सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात त्यांनी पर्यटन आणि कोकण विभागाकडे विशेष लक्ष दिले आहे. राजकीय दृष्ट्यादेखील कोकणाचा विकास सेनेसाठी महत्वाचा आहे. मात्र, यासोबत विदर्भ देखील तितकाच महत्वाचा आहे. परंतु, या अर्थसंकल्पात विदर्भासाठी विशेष असे काहीही नाही. विदर्भाला यावेळी दुर्लक्षित करण्यात आले. कोकणप्रमाणेच विदर्भालादेखील पॅकेज आवश्यक होते. कारण, विदर्भ मागासलेला आहे. त्याचा विकासदेखील तितकाच महत्वाचा असल्याचे खांदेवाले म्हणाले.
हेही वाचा - 'सरकारने विदर्भातील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली'
रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण उभारणीवर सरकारने भर दिला आहे. मात्र, प्रशिक्षणाच्या अभावामुळे रोजगार नाहीत का, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. उद्योजकांना सोबत घेऊन रोजगार निर्मितीबद्दलच्या योजना सरकारनी आणायला हव्यात. शासनाने अर्थसंकल्पात या मुद्दयावर काम करणं अपेक्षित होतं. कारण, पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करण्यापेक्षा औद्योगिक क्षेत्रात निर्मिती करणे लाभदायी असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
हेही वाचा - अॅक्सिस बँक प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उच्च न्यायालयाची नोटीस