नागपूर - सरकारच्या धोरणांचा निषेध करत याठिकाणी नागपूर शहर सुधार समितीच्या नेतृत्वात एक आंदोलन करण्यात आले. आंदोलनात काही ई-रिक्षा चालकांनी भर वाहतुकीत त्यांच्या रिक्षा उलट्या दिशेने चालवत राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला आहे. आंदोलनाच्या माध्यमातून 200 युनिट्सपर्यंत वीज-पाणी मोफत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सरकार संकटकाळात वाढीव वीज बिल पाठवून नागरिकांचे संकट वाढवत आहे. 'उद्योजकांना माफी आणि सामान्य नागरिकांना शिक्षा' हे सरकारचे उलटे धोरण असल्याचे आंदोलकांनी म्हटले. लॉकडाऊनच्या काळात ऑटो-रिक्षाचा व्यवसाय पार बुडालेला आहे. त्याचबरोबर ई-रिक्षाचालक आणि टॅक्सीचालक तसेच मालकही आर्थिक संकटात अडकलेले आहे.
सलग पाच महिने काम धंदा नसल्याने यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य आणि केंद्र सरकार ऑटो रिक्षा चालकांना जगवण्यासाठी कोणत्याच उपाय योजना करत नसल्याने नागपुरात अनेकांनी हा व्यवसाय सोडून दुसरे काम सुरू केले आहे. याकठीण काळातील भीषण परिस्थिती लक्षात घेता सरकारनं विज आणि पाणी बिल माफ करावे, रिक्षा चालकांच्या मुलांना दहावी आणि बारावी नंतरचे शिक्षण मोफत मिळावे या सह अनेक मागण्या या आंदोलकांनी केल्या आहे. शासनाने या कडे सहानुभूतीपुर्वक लक्ष दिले नाही तर असहकार आंदोलन स्वरूपात जनसत्याग्रह करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.