नागपूर - हजारो किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावलेल्या सी-१ वाघाचे रेडिओ कॉलर वनविभागाने काढले आहे. आता या वाघावर कॅमेऱ्याच्या मदतीने नजर ठेवली जाणार आहे. सी-१ वाघाने यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर ते बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य दरम्यानचा प्रवास १४ महिन्यात तब्बल तीन हजार सतरा किलोमीटर फिरून पूर्ण केला आहे. एखाद्या वाघाने आपले अधिवास शोधण्यासाठी इतका लांबचा प्रवास करणे ही घटना अभूतपूर्व असल्याचे मत वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
गेल्यावर्षी यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर जंगलातील सी-१ या वाघाने सुरू केलेल्या प्रवासकडे साऱ्या वन्यप्राणी प्रेमींचे लक्ष लागले होते. कारण, या वाघाने तब्बल तीन हजार सतरा किलोमीटरचा प्रवास केला होता. या प्रवासादरम्यान सी-१ वाघाने विदर्भासह तेलंगणा राज्यातील अनेक जिल्ह्यांचा प्रवास केला. अखेर सी - १ वाघाला बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य पसंतीला पडल्याने त्याने तिथेच आपले अधिवास निश्चित केले आहे.
सी-१ वाघ टिपेश्वर अभयारण्यात असताना २०१९ च्या सुरुवातीला रेडिओ कॉलर लावण्यात आले होते. त्यानंतर त्याने सुरक्षित अधिवास शोधण्यासाठी केलेल्या प्रवासाची नोंद रेडिओ कॉलरमुळे घेणे शक्य झाले होते. ज्यावेळी सी-१ वाघाला रेडिओ कॉलर लावण्यात आले, तेव्हा तो लहान होता. मात्र, आता तो मोठा झाल्यामुळे त्याच्या गळ्यातील रेडिओ कॉलरचा फास आवळला गेला. त्यामुळे, वन विभागाने रिमोट कंट्रोलच्या मदतीने रेडिओ कॉलर काढण्यात आले आहे. परंतु, आता सी-१ वाघावर कॅमेऱ्याच्या मदतीने लक्ष ठेवले जाणार आहे.