नागपूर - शहरातील दत्तात्रय नगर येथे दुहेरी हत्याकांड घडले. वयोवृद्ध मामा आणि त्यांच्या 55 वर्षीय भाचीची हत्या करण्यात आली आहे. मंजुषा जयंतराव नाटेकर आणि अशोक काटे अशी मृत व्यक्तिंची नावे आहेत. या हत्याकांडामागे मृत मंजुषा नाटेकर यांचे पती जयंत नाटेकर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मंजुषा नाटेकर या दत्तात्रय नगरामधील देशमुख अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. भारतीय ज्ञानपीठ प्राथमिक शाळेत त्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या, तर त्यांचे पती जयंत हे वाहनचालक आहेत. नागपुरातीलच जवाहर नगर येथे राहणारे मंजुषा यांचे मामा अशोक काटे काही दिवसांसाठी मंजुषा यांच्याकडे राहायला आले होते.
हेही वाचा - महिलांवरील अत्याचाराविरोधात आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यातही कायदा लागू करू"
सोमवारनंतर मंजुषा या शाळेत गेल्या नाहीत. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून त्यांच्या शाळेतील इतर शिक्षक त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांचा फोनवर संपर्क होत नसल्याने ललित रारोकर नावाच्या शिक्षकाने मंजुषा यांचे भाऊ राजीव खनगर यांच्याशी संपर्क केला. राजीव खनगर यांनी मंजुषा यांच्या घरी येऊन पाहणी केली असता आतून दुर्गंधी येत असल्याने त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. समोरच्या खोलीत मामा आणि आतील खोलीत मंजुषा मृतावस्थेत आढळले. या घटनेची माहिती सक्करदार पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.
शनिवार ते सोमवार या दोन दिवसांच्या दरम्यान नाटेकर दाम्पत्यामध्ये कौटुंबिक कारणांवरून अनेकवेळा कडाक्याचे भांडण झाले होते. त्यातूनच जयंत नाटेकर यांनी पत्नी मंजुषा आणि त्यांचे मामा अशोक काटे यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.