नागपूर - नागपुरात कोरोना बाधित रुग्णसंख्या मागील 10 ते 12 दिवसात मोठ्या प्रमाणात खाली आहे. पण रुग्णसंख्या कमी होऊन सुखावून जाता कामा नये, कारण अजूनही मृत्यूची संख्या आटोक्यात आली नाही. मुंबई पाठोपाठ नागपूरात ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशनला सुरुवात केल्याचा आनंद आहे, असे मत पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी व्यक्त केले. शहरातील बैद्यनाथ चौक येथील ट्रीलीयन मॉलमध्ये त्यांनी साठ वर्षांवरील जेष्ठांच्या ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन मोहिमेची सुरुवात केली.
आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्न..
यामध्ये आणखी कडक निर्बध लावून मृत्यूची संख्या आहे ती कमी करण्यासाठी आणखी प्रयत्नांची गरज आहे. जेणेकरून नागपूरकरांच्या जीव वाचवू शकू. यासाठी शनिवारी आढावा बैठक बोलावली आहे. या बैठकीत उपाययोजना संदर्भात निर्णय घेऊ. तिसऱ्या लाटेचा शक्यता पाहता नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत आहे. नागरिकांनी मास्क लावावे, विनाकारण घराबाहेर पडू नये. लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. लसीकरण आणि आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी आणखी काम केले जात आहे असेही राऊत यावेळी म्हणालेत.
ज्या नागरिकांना स्वतः एकटे येणे शक्य नाही, जे ज्येष्ठ नागरिक अंथरूणाला खिळून आहेत. किंवा अन्य आजाराने ग्रस्त आहेत. ज्यांना कोणाच्या तरी मदतीची गरज आहे. अशा 60 वर्षावरील नागरिकांना वाहनाने आणल्यास तेथेच बसावे.शहरातील तरुणांनी या दोन केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी आणण्यात मदत करावी, स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी, असेही आवाहन डॉ.राऊत यांनी केले.