नागपूर- ८ मे ला जागतिक थॅलेसेमिया दिवस पाळला जातो. थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना साधारणतः दर १५ दिवसांनी रक्त पुरवठा करावा लागतो. परंतु, कोरोनाच्या संकट काळात थॅलेसेमिया रुग्णांना अधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हेही वाचा- मुंबईत नवीन 692 कोरोनाग्रस्तांची नोंद, एकूण रुग्णसंख्या 11 हजारांच्या वर
अशा या जीवघेण्या आजारापासून वाचण्यासाठी दर १५ ते ३० दिवसात नवे रक्त रुग्णांना चढवणे हाच एकमेव उपाय आहे. परंतु, लॉकडाऊनमुळे रुग्णांना नवे रक्त मिळणे कठीण झाले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे रक्त संकलन होत नसल्याने रक्त पेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा आहे. रक्ताचा तुटवडा असल्याच्या बातम्या येताच अनेकजण स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी समोर आले. त्यामुळे रक्त पेढ्यांत पुरेशा रक्तसाठा असल्याचे सांगितले जात आहे.
परंतु, थॅलेसेमिया रुग्णांना ताजे म्हणजेच ७ दिवसातील रक्त लागते ज्याचा सध्या तुटवडा आहे. सोबतच थॅलेसेमिया रुग्णांना मोफत रक्त देण्यात येते. पण, त्यासाठी त्यांना एक डोनरही द्यावा लागतो. डोनर हा नातेवाईक नसावा असा नियम आहे. ज्यामुळे लॉकडाऊनच्या परिस्थितीत डोनर मिळणे अश्यक्य झाले आहे. थॅलेसेमियाच्या रोकथामसाठी विवाहपूर्व थॅलेसेमिया तपासणी करणे कधीही फायद्याचे आहे. मध्य भारतातील ८०० थॅलेसेमिया रुग्णांची नोंद असलेल्या नागपूरच्या थॅलेसेमिया केंद्रात आतापर्यंत अशा ५० हजारांवर रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. या सर्व रुग्णांना मोफत रक्ताचा पुरवठा करण्यात येतो.
शासकीय रुग्णालयात देखील थॅलेसेमिया रुग्णांना मोफत रक्त पुरवठा करण्यात येतो. मात्र, आता शासकीय रुग्णालये हे कोविड रुग्णालये झाल्याने तिथे रुग्णांचे जाणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे थॅलेसेमिया सारख्या दुर्धर आजाराशी सामना करणाऱ्या या रुग्णासाठी रक्तदात्यांनी अधिक संख्येने समोर येणे आवश्यक आहे. सोबतच रक्त पेढ्यांनीही छोट्या-छोट्या स्वरुपात रक्तदान शिबिरे अधिक प्रमाण घेतल्यास थॅलेसेमियाच्या रुग्णांवर उपचार करणे सोपे होईल.
काय असतो थॅलेसेमिया...
-थॅलेसेमिया हा अनुवांशिक व जीवघेणा आजार आहे.
-माता-पित्यांकडून तो मुलाला होतो.
-४ टक्के लोकसंख्येत थॅलेसेमिया जनुक (Gene) असतो.
-थॅलेसेमिया रुग्णांना १५ ते ३० दिवसांनी नवे रक्त चढवावे लागते.
-औषधे फार महाग असतात.
-बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा त्यावर एक उपाय ठरतो. पण, हा देखील फार खर्चिक आहे (१२- १४ लाख) शिवाय योग्य डोनर मिळत नाही.