नागपूर - कोरोनाच्या काळात डॉक्टरांनी अहोरात्र रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले. एकीकडे मृत्यूचे तांडव, तर दुसरीकडे वाढते रुग्ण; या भयावह परिस्थितीत डॉक्टरांनी कोरोना योद्धा म्हणून काम केले. मध्य भारतातील सर्वात मोठे असलेल्या नागपूरच्या शासकीय महाविद्यालय रुग्णालयाची ओळख आहे. याच रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे कोरोना काळात 9 महिने कुटुंबापासून वेगळे राहिले. रुग्णसेवेत डॉक्टर म्हणून कुटुंबाचे योगदान महत्वाचे आहे. कोरोना काळातील यासारखे अनेक अनुभव त्यांनी डॉक्टर्स डे निमित्त सांगितले आहेत.
'पीपीई किटमुळे शरीर ओलेचिंब, तहानेने व्याकूळ'
'महाराष्ट्राची उपराजधानी असलेले नागपूर कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट राहिले. दररोज हजारो रुग्ण उपचार घेण्यासाठी नागपूरच्या शासकीय महाविद्यालय रुग्णालयात येत होते. पहिल्या लाटेत रोज नवीन अनुभव आला. एका समस्येवर मात केली, असे वाटत असताना दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन समस्येला तोंड द्यावे लागत असे. यात पहिल्या लाटेत आजाराबद्दल उपचारपद्धती, रुग्ण हाताळणे याचा फारसा अनुभव नसताना अनेक समस्यांना समोर जावे लागले. लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना सांभाळणे त्याहून कठीण होते. यात पीपीई किट घालून काम करताना शरीर पूर्ण ओलेचिंब होत होते. त्यामुळे हा अनुभव तर वेगळाच होता. पीपीई किट घालून 5 ते 6 तास पाण्याच्या तहानेने व्याकूळ होऊन काम करावे लागले. यासोबत इतक्या मोठ्या रूग्णालयात प्रशासकीय जबाबदारी सांभाळने, रोज शेकडो सह्या, येणाऱ्या रुग्णांना उपचाराची सोय, नागरिकांच्या तक्रारी, प्रशासकीय बैठका, उशिरापर्यंत चालणारे काम या सर्वच जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या', असे डॉ. गावंडे यांनी सांगितले.
'मुलाचा धन्यवाद देणारा फोन कायम स्मरणात राहणारा'
नागपुरात कोरोनाच्या काळात चांगले वाईट अनुभव आल्याचे डॉ. अविनाश गावंडेंनी सांगितले. 'एकदा कोरोना वॉर्डात रुग्णांचा फोन आला. 'सर माझ्या आईला गरम दूध प्यायची सवय आहे. पण आम्हाला देत येणार नाही', असे पलीकडून मुलगा बोलला. असे सांगताच लागलीच त्यासाठी व्यवस्था केली. काही वेळात मुलाला आईचा फोन गेला आणि गरम दूध मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर मुलाचा धन्यवाद म्हणण्यासाठी पुन्हा फोन आला. हा आलेला फोन कायम स्मरणात राहणारा होता', असे गावंडेंनी सांगितले.
'लोकांसाठी काहीतरी करू शकलो हा आनंद वेगळाच'
'यादरम्यान ईद असल्याने बरेच रुग्ण मुस्लिम बांधव होते. त्यांना घरात आनंदात ईद साजरी करता येणार नाही, याची उणीव वाटू नये म्हणून ईद निमित्य शिरखुर्मा देण्याचे ठरवले. यावेळी कोरोना वॉर्डातील रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य आणि आपण या काळात त्यांच्यासाठी काहीतरी करू शकलो हा आनंद वेगळाच होता', असे डॉ. गावंडे म्हणाले.
'तब्बल 9 महिने कुटुंबापासून सोशल डिस्टन्स, लिफ्टने यायचे जेवणाचे ताट'
'रुग्णालयाचा डोलारा सांभाळताना कुटुंबियांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी विशेष काळजी घ्यावी लागली. पहिल्या लाटेत आजाराची तीव्रता जास्त होती. त्यामुळे एकाच घरात राहताना सर्वांशी दूर राहण्याचा निर्णय घेतला. एका दहा बाय दहाच्या खोलीत 8 मार्च 2020 पासून सुरू झालेला प्रवास पुढील बरेच महिने असाच राहीला. रोज मुलांना जवळ घेऊन बोलण्याची सवय असल्याने सुरवातीला काही दिवस कठीण गेलेत. यात त्यांना वेळही देता येत नव्हता. त्याच घरात कुटुंब वर राहायचे. लिफ्टने जेवणाचे ताट खालच्या खोलीत यायचे. बोलणे झाले तरी लांबवरून मुलांसोबत, आईसोबत बोलायचे. कोरोनाची लागण झाली नसताना कोरोना झाल्याप्रमाणे सामाजिक अंतर ठेवून कुटुंबियांपासून तब्बल 9 महिने दूर राहण्याची वेळ आली. अनेकदा ते क्षण आठवले की डोळ्यात अश्रू येतात. पण तरीही कुटुंबाने तक्रार करण्याऐवजी धीर आणि प्रोत्साहन देण्याचे काम केले. यामुळेच हे सर्व काम इतक्या उत्साहाने करता आले', असे गावंडेंनी सांगितले.
'कोरोनाने ग्रासले, लसीने वाचवले'
'या काळात काळजी घेऊन काम केले. पण एक दिवस रुग्णालयात काम करताना मास्क तुटला आणि त्यानंतर कोरोनाची लागण झाली. सुदैवाने दोन्ही लसीचे डोस झाले. यामुळे कोरोनाची लागण होऊनही अवघे तीन तास ताप राहिला. त्यानंतर लक्षणे दिसून आली नाहीत. पण 14 दिवस घरात राहुनही काम केले. यामुळे कोरोनाच्या नियमाचे पालन करताना मास्क सॅनिटाझर आणि सामाजिक अंतर पाळणे गरजेचे आहे. कारण कोरोनाची लस घेतली म्हणून मोकाट होऊ नका. लस घेऊन स्वतःला सुरक्षित करून घेणे आवश्यक आहे', असे आवाहन गावंडेंनी केले आहे.
मोदींकडून डॉक्टांचे कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज डॉक्टर्स दिनाच्या निमित्ताने भारतीय जनतेशी संवाद साधला. 'एखाद्या व्यक्तीचे आयुष्य गमावणे हे दु:खदायी घटना असते. मात्र, देशाने कोरोनापासून लाखो लोकांचे प्राण वाचवले आहेत. याचे मोठे श्रेय यासाठी परिश्रम करणारे डॉक्टर, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आहे', असे यावेळी मोदी म्हणाले आहेत.
म्हणून देशात १ जुलैला साजरा होतो राष्ट्रीय डॉक्टर्स डे
भारताचे प्रसिद्ध चिकित्सक डॉ. विधान चंद्र रॉय यांना श्रद्धांजली आणि त्यांच्या सन्मानार्थ १ जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. डॉक्टरला देवाचं रूप मानलं जातं. अनेक रूग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी डॉक्टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला देवदूत असतो. अमूल्य सेवेसाठी डॉक्टरांचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
हेही वाचा - "डॉक्टर डे"लाच पुण्यातल्या डॉक्टर दाम्पत्याची आत्महत्या, काही महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न