नागपूर - पुन्हा एक बाल विवाह रोखण्यात नागपूर जिल्हा बाल संरक्षण समितीला यश मिळाले आहे. मुलाचे वय 18 वर्ष तर मुलगी ही केवळ 15 वर्षांची आहे. कळमना परिसरात बाल विवाह होणार असल्याची गुप्त माहिती समजताच जिल्हा बाल संरक्षण समितीच्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने कारवाई करत बाल विवाह रोखला. (Child Protection Committee) ही घटना काल गुरूवार (दि. 10 मार्च) रोजी घडली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नाही.
अल्पवयीन नवरी- नवरदेव बोहल्यावर चढण्याच्या तयारीत होते
नागपूर शहरातील कळमना भागात अल्पवयीन मुला-मुलींचे लग्न होणार असल्याची माहिती एका संस्थेच्या माध्यमातून बाल संरक्षण अधिकाऱ्यांना समजली होती. माहितीच्या आधारे बाल संरक्षण समितीचे अधिकारी मंडपात धडकले तेव्हा वधू-वर आणि वन्हऱ्हाडी तयार होते. दोन्ही बाजूचे नातेवाईक सजून-धजून पोहोचले होते. अल्पवयीन नवरी- नवरदेव बोहल्यावर चढण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी जिल्हा बालसंरक्षण समितीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने कारवाई करत बाल-विवाह थांबवला आहे.
मुलीचे वय केवळ 15 वर्ष
सुरवातीला दोन्ही कुटुंब ऐकायला तयारच नव्हते. मात्र, कायदेशीर कारवाई होणार असल्याचे लक्षात येताच त्यांनी वधू-वर पक्षातील मंडळींनी नमते घेतले. जिल्हा बाल संरक्षण समितीच्या अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली तेव्हा मुलीचे वय १५ वर्षे तर नवरदेवाचेही वय १८ वर्षे असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे वर-वधू सह लग्नात सहभागी झालेल्या नातेवाईकांवर सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - गोव्यातील विजयानंतर भाजपाचा मुंबईत जल्लोष, देवेंद्र फडणवीसांचा जंगी सत्कार, पाहा VIDEO