नागपूर : सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात कोणत्याही प्रकारची चर्चा न झाल्याची माहिती मिळते आहे. या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत सत्तासंघर्षावर चर्चा होईल अशी शक्यता होती. मात्र, आज नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उदघाटनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट मुंबईला रवाना झाल्यामुळे कोणत्याही प्रकारची चर्चा सत्ताधारी आणि सरसंघचालकांमध्ये झाली नाही.
शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता : राज्याच्या सत्तासंघर्षात काही दिवसांपासूनचं पडद्यामागून जोरदार हालचाली सुरू असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे नाराजी नाट्य रंगले होते. राज्यात मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपमध्ये सारेकाही आलबेल नाही ही देखील चर्चा जोर धरू लागली आहे. या संपूर्ण प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची एन्ट्री झाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
चर्चेला विराम ? एकीकडे अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले असता फडणवीस मात्र, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील असे सांगून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्नांत दिसत आहे. अमित शहा नागपुरात येऊ न शकल्याने सरसंघचालक मोहन भागवत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या काही बैठक होईल अशी चर्चा सुरू झाली होती मात्र, दोन्ही नेते आपल्या नियोजित दौऱ्यावर निघून गेल्याने या चर्चेला विराम मिळाला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून फडणवीसाची स्तुती : 'एनसीआय' म्हणजे मध्यभारतातील कॅन्सरच्या उपचाराचे आरोग्य मंदिरचं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मेहनतीतून ही संस्था निर्माण झाल्याचे सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री असतांना देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भासाठी वरदान ठरणाऱ्या हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडली. हा प्रकल्प पूर्णत्वास घेवून जाण्यासाठी मेहनत घेतली. या घटनेचा साक्षीदार असल्याचे त्यांनी सांगितले. एनसीआयची नागपुरात उभारणी करण्याची संकल्पना मांडून तीही उपमुख्यमंत्र्यांनी पूर्णत्वास नेली. घेतलेले काम पूर्णत्वास नेण्याची त्यांची खुबी आहे. ही संस्था उभी राहणे मोठी उपलब्धी, ऐतिहासिक कामगिरी आहे. सर्व सामान्य रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळेल. ही संस्था विदर्भासह महाराष्ट्र आणि मध्यभारतातील कॅन्सर उपचारासाठी आरोग्य मंदिर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - Mango Rates Expensive: आंब्याचे भाव गगनाला, ग्राहकांना किंमत कमी होण्याची प्रतीक्षा