नागपूर - हिवाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर कडाडून टीका केली. अवकाळी पावसाने राज्यात ९३ लाख हेक्टरवरिल पीकांचे नुकसान झाले. यासाठी २३ हजार रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळायला हवी होती. मात्र, या सरकारने ७५० कोटी रुपयांची मागणी पुरवणी यादीतून केली, याचाच अर्थ या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात करण्याची मालिका सुरू केली असल्याचे फडणवीस म्हणाले.
महाविकास आघाडीने संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले. मात्र, याची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई मिळाली नाही. शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी फडणवीस यांनी यावेळी केली.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल १६ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आल्या. आम्ही सत्तेत असताना ८ हजार कोटी रुपयांच्या मागण्या आल्या. तेव्हा विरोधकांच्या पोटात दुखायचे, असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.