नागपूर - बजाज नगर येथील पोलीस ठाण्याच्या नव्या वास्तूचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्याचे ऊर्जामंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर नंदा जीचकार उपस्थित होत्या.
सुमारे सहा महिन्यांपूर्वी बजाज नगर पोलीस ठाण्याची इमारत बांधून तयार झाली होती. मात्र, ज्या जागेवर नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले, त्या जागेवरून वाद निर्माण झाल्यामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम रखडला होता. त्यानंतर सर्व विभागांच्या परवानग्या मिळाल्यानंतर आज या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनानंतर फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले ते म्हणाले, की तंत्रज्ञानाचा उपयोग करून पोलिसींगमध्ये गुणात्मक बदल करण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात आले आहेत. तसेच गुणात्मक पोलिसींग करताना पोलिसांना मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात, या उद्देशानेदेखील महत्वाची पाऊले उचलण्यात आली आहेत. त्यामुळेच आज नागपुरातील अनेक पोलीस ठाण्यांचे चित्र बदलले आहे. याच बरोबर तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुन्हेगारांना अटक करणे आणि त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देणे, या बाबतीतही तंत्रज्ञान महत्वाची भूमिका पार पाडत असल्याचेदेखील ते म्हणाले.