नागपूर : काही दिवसांपुर्वी राज्यातील प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आता 400 कोटींचा ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प मध्यप्रदेशमध्ये गेला आहे. पुन्हा एक उद्योग प्रकल्प हा महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप राज्य सरकारवर होत आहे, यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांनी चुकीच्या गोष्टी प्रसारित करू नये. उद्योग हे राज्याबाहेर जात असल्याची सर्व टाईमलाईन महाविकास आघाडी सरकारच्या काळातील असल्याचे( Devendra Fadnavis critics on mahavikas aaghadi ) त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीवर टीका - ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्पाचे एकूण तीन पार्ट असतील. सध्या एकाच प्रकल्पाचे अलॉटमेंट झाले असून आणखी दोन पार्टची घोषणा होणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जे उद्योग कधीही महाराष्ट्रात आलेच नाही, ते महाराष्ट्रातून गेल्याचा कांगावा करणे चुकीचे आहे. यामुळे महाराष्ट्राची बदनामी होते, असे ते म्हणाले आहेत. कुठलीही माहिती न घेता महाविकास आघाडीचे अपयश आमच्या माथी मारू नका असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
ती जितेंद्र आव्हाडची स्टाईल - एकाद्या गोष्टीचा कांगावा करणे ही आव्हाडांची स्टाईल आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत जाऊन चित्रपट गृहात मारहाण केली म्हणून कारवाई झाली आहे. आपण खुप मोठे केले आहे, हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
जबाबदारी पूर्ण करणार - गुजरात विधानसभेच्या निवडणुकीची जबाबदारी देवेंद्र फडवणीस यांच्यावर दिली आहे. त्यावर ते म्हणाले की, गुजरात निवडणूकीत पक्षाने जी जबाबदारी दिली आहे ती पूर्ण करणार आहे. मला गुजरातमध्ये प्रचार करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे.