नागपूर : अडीच वर्षांचा त्यांचा कारभार पाहिल्यानंतर नेमका फडतूस कोण आहे, हे आता अख्ख्या महाराष्ट्राला माहित झालं आहे. दोन मंत्री जेलमध्ये गेल्यानंतरही त्यांचे राजीनामा घेण्याची यांच्यात हिंमत नाही. त्या मंत्र्यांच्या भोवती हे लाळ घोटात असतात, त्यांना बोलण्याचा अधिकार काय? असा संतप्त सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर ते आज नागपुरात बोलत होते.
'असे बोलण्याची माझी पद्धत नाही' : आम्ही ज्या दिवशी बोलणं सुरू करेल त्या दिवशी तुमची पळता भुई होईल, त्यामुळे संयमाने बोला, असा इशारा फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, यांचा जो थयथयाट चालू आहे त्याला उत्तर देण्याची काही गरज नाही. पहिले तर त्यांनी उत्तर दिलं पाहिजे की ते मोदींचे फोटो लावून निवडून येतात आणि त्यानंतर विरोधकांची लाळघोटत बसतात. ते कुठल्याही भाषेत बोलले तर मला पण त्या भाषेत बोलता येते, कारण मी नागपूरचा आहे. पण मी तसे बोलणार नाही, कारण तसे बोलण्याची माझी पद्धत नाही.
'मी गृहमंत्री असल्यामुळे अनेकांना अडचणी' : ते पुढे म्हणाले की, मी त्यांना एवढंच सांगतो की, मी पाच वर्षे मी राज्याचा गृहमंत्री राहिलो आहे. आता पुन्हा मीच गृहमंत्री आहे. ते पाण्यात देव ठेवून बसले आहेत. मात्र मी त्यांना सांगतो मी गृहमंत्री पद सोडणार नाही. कारण त्यांच्यामुळे मी गृहमंत्री नाही. मी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री आहे आणि जो चुकीचे काम करेल त्याला मी जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही.
चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात : उद्धव ठाकरे यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांची बरोबरी करू शकत नाही, ते फक्त तसा आव आणत असल्याची घणाघाती टीका बावनकुळे यांनी केली आहे. सत्तेच्या लोभात उद्धव ठाकरेंनी भाजपचा विश्वासघात केला, त्यामुळे याचा बदला घेतला पाहिजे असे बावनकुळे म्हणाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा अशी व्यक्तिगत टीका केली तर भाजपा तुम्हाला घराबाहेर पडू देणार नाही, तुम्हाला कायमचे घरकोंबडा व्हावे लागेल, असा खणखणीत इशारा भाजपा त्यांनी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.
'उद्धव ठाकरेंना ही शेवटची संधी' : ते पुढे बोलताना म्हणाले की, 'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी होते. त्यांच्या मंत्र्याचे दाऊदबरोबर संबंध स्पष्ट झाले आणि त्यांना तुरुंगात जावे लागले तरीही उद्धव ठाकरे त्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढू शकले नाहीत. सत्तेसाठी त्यांनी लाळघोटेपणा केला. वाझेसारख्या अधिकाऱ्याच्या बाबतीतही त्यांनी लाळघोटेपणा केला. अशा बेईमान, विश्वासघाती आणि घरकोंबड्या व्यक्तीने देवेंद्र फडणवीस सारख्या कर्तृत्ववान व्यक्तीबद्दल अशा रितीने बोलणे योग्य नाही. उद्धव ठाकरे यांनी आज सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यांना भाजपा शेवटची संधी देत आहे.
हेही वाचा : Ashish Shelar on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना हिंदूंबाबत इतकी चीड का? आशिष शेलारांचा घणाघात