नागपूर - विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स तयार केल्यास मोठ्या प्रमाणात उद्योगांना आकर्षित करता येईल. याकरिता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी चर्चा केली. तसेच यासंदर्भात एक प्रेझेन्टेशन सादर केले. यात केंद्रीय मंत्री यांनी सकारात्मकता दाखवत या प्रकल्पाच्या अनुषंगाने टेक्नोफिझिबिलिटी म्हणजेच तांत्रिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री प्रधान यांनी दिले.
'वेद'कडून प्रस्ताव सादर -
विदर्भात जागतिक दर्जाचे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स स्थापन करण्यासंदर्भातील विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (वेद) प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली. यावेळी खासदार अशोक नेते आणि वेदचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. वेदच्या शिष्टमंडळात प्रदीप माहेश्वरी, विनायक मराठे, शिवकुमार राव, नवीन मालेवार इत्यादींचा समावेश होता. अतिशय सविस्तर सादरीकरण यावेळी केंद्रीय मंत्र्यांसमोर करण्यात आले.
रोजगार वाढीस मिळणार चालना -
14 जून रोजी देवेंद्र फडणवीस हे नागपुरात असताना यासंदर्भातील सादरीकरण त्यांच्यापुढे करण्यात आले. तेव्हाच देवेंद्र फडणवीस यांनी धर्मेंद्र प्रधान यांना दूरध्वनी करून या प्रकल्पाबाबत चर्चा केली होती. तेव्हाही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रत्यक्ष भेटी दरम्यान तर त्यांनी टेक्नोफिझिबिलिटी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे एक महत्त्वाचा टप्पा यातून सुरू होईल. या पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स संदर्भात अभ्यास वेदकडून करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे विदर्भात अनेक नवे उद्योग येतील, गुंतवणूक आणि रोजगार वाढण्यासाठी सुद्धा मोठी मदत होईल यामुळे केंद्रीय मंत्री प्रधान सकारात्मक असून त्यांने दिलेल्या तात्काळ निर्णयामुळे त्यांचे आभार व्यक्त केले.