नागपूर - राज्य सरकारने कोरोनासाठी जे 5300 कोटोची पॅकेज जाहीर केलं आहे ते लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचं काम केलं असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. लॉकडाऊन जाहीर करताना राज्यसरकारने अनेक वंचित घटकांचा विचार केला नसल्याचेही फडणवीस म्हणाले.
राज्यसरकारने कोरोनासंबंधी बेड्स, व्हेंटीलेटर, यांबाबत माहिती देणे अपेक्षित होते. मात्र, याबाबत सरकारने कोणतीही माहिती दिली नाही. एवढचं नाही तर लॉकडाऊन जाहीर करताना सरकारने अनेक वंचित घटकांना कोणतीही मदत केली नसल्याची टीकाही फडणवीसांनी केली आहे. केंद्र सरकारच्या श्रावणबाळ, वृद्धपाल योजनांमध्ये सरकारने लाभार्थींची दिशाभूल केली असल्याचे फडणवीस म्हणाले.
आदिवासी घटकांच्या तोंडाला पुसली पाने
राज्य सरकारने पुन्हा आदिवासी घटकांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. शेतकरी, शेतमजूरला सरकारने कोणतीही मदत केली नाही. आदिवासींना दिले जाणारे खावटी अनुदान केवळ आगाऊ वाढवून दिले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात जाणारा पैसा थांबला असल्याचेही फडणवीस म्हणाले.
नागपूरमध्ये आरोग्य यंत्रणेत वाढ हवी
राज्य सरकारला पुणे मुंबई शिवाय दुसरे कोणतेच शहर दिसत नसल्याचेही फडणवीस म्हणाले. नागपूर नाशिमध्येही पुणे मुंबईच्या धर्तीवर आरोग्य व्यवस्था उभारल्या गेल्या पाहिजे असल्याचे मत फडणवीसांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे मी आता स्वत: नागपुरात राहून आरोग्य व्यवस्थेवर लक्ष ठेवणार असल्याचेही फडणीसांनी स्पष्ट केले आहे.