नागपूर - मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जालन्यात ओबीसीच्या मेळाव्यात ओबीसीचा उपमुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. यावर, अनेक समाजाचे मेळावे होत असतात. ओबीसीचा, आदिवासींचा. मेळाव्यात कधी कधी उत्स्फुर्तपणे टाळा पडायला लागल्यानंतर अधिकचे वाक्य तोंडातून बाहेर निघतात. टाळ्या वाढल्या की कधी कधी असे घडत असते. वडेट्टीवार हे टाळ्यांच्या प्रभावात बोलले असल्याचा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.
हेही वाचा - नागपूरमध्ये भाजप-राष्ट्रवादीत रंगले 'आंदोलन वॉर'
अजित पवार नागपुरातील विभागीय कार्यलयातील पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्याची परंपरा पाहता अनेक जण मुख्यमंत्री झाले आहेत. यात वडेट्टीवार यांना ओबीसीचा उपमुख्यमंत्री झाला पाहिजे, असे वाटत असेल, तर त्यांच्या इच्छेला माझ्या शुभेच्छा असल्याचे, अजित पवार म्हणाले. यावेळी नियोजन समितीची बैठक असताना भाजपच्या वतीने बहिष्कार टाकत विभागीय कार्यालयात आंदोलन करण्यात आले होते. भाजपने राज्य सरकारच्या विरोधात नारेबाजी केली. यावर भाजपच्या शिष्टमंडळाला बोलवण्यात आले. त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यात डीपीडीसीच्या आराखड्यात वाढ करून ते 850 कोटी करावे, अशी मागणी भाजपने केली. यावर आराखडा निधी सुत्रानुसर वाटप केला जाईल, असे सांगण्यात आले.
भाजपकडून विकास कामे बंद असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात मुंबईत बैठक बोलावली आहे. यात संबंधित विभागाचे अधिकरी आणि मंत्री यांच्या उपस्थितीत बसून चर्चा केली जाईल. काही त्रुटी असल्यास दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.
हेही वाचा - नागपूर : भाजयुमोतर्फे अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न