नागपूर - नागपूर महानगरपालिकेचे ५४ वे महापौर म्हणून भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी पदभार स्विकारला. त्याच बरोबर उपमहापौर मनीषा धावडे यांनीदेखील आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. मनपाच्या प्रशासकीय इमारतीचा आवारात हा प्रदग्रहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या निवडणूका -
मावळते महापौर संदीप जोशी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांनी गेल्या महिन्यात महापौर पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ५ जानेवारीला ऑनलाइन पद्धतीने महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यात आली होती. ज्यामध्ये भाजपचे जेष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी आणि मनीषा धवड यांनी दणदणीत विजय मिळवला होता. आज या दोन्ही नेत्यांनी पदभार स्विकारला.
विकास कामांना चालना देणार -
गेल्या एक वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेतील सर्व विकासकामांना ब्रेक लावण्यात आलेला आहे. माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मनपाची तिजोरी रिकामी असल्याचे कारण देत सर्व प्रकारची विकासकामे स्थगित केली होती. त्यानंतर मुंढे यांची बदली मुंबईला झाल्यामुळे आयुक्त म्ह्णून आलेल्या राधाकृष्णन बी यांनीदेखील विकासकामांना मंजुरी दिली नसल्याने नगरसेवकांची नाराजी वाढत आहे. या सर्व समस्यांचे समाधान शोधून पुन्हा नव्याने विकासकामांना चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - उसाच्या ट्रॅक्टरला कारची धडक; पती-पत्नी जागीच ठार