नागपूर - ज्या नेत्यांनी वर्षानुवर्षे भाजप-सेनेला जातीयवादी पक्ष म्हणून हिनवले त्याच नेत्यांना पक्षात घेतल्याने पक्षाचे संख्याबळ वाढेल परंतु 'पक्षबळ' कधीच वाढणार नाही. म्हणूनच 'या रे या,सारे या' असे म्हणणे आता बंद झाले पाहिजे, असा मार्मिक टोला संघ-भाजपचे मुखपत्र समजले जाणाऱ्या दैनिक 'तरुण भारत'च्या संपादकीयमध्ये लगावण्यात आला आहे. मुखपत्रातून पक्षालाच लक्ष केल्याने हा संपादकीय लेख चर्चेचा विषय ठरत आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस-राष्ट्रवादीमधून भाजप व शिवसेनेत मोठ्या प्रमाणात नेते प्रवेश करत आहेत. कधीकाळी हेच नेते भाजप-सेनेला जातीयवादी पक्ष म्हणून हीनवत होते. पुढील काही वर्षे सत्ताबदल होणार नाही हे समजल्यावर सत्तेसाठी कासावीस झालेली काँग्रेस व राष्ट्रवादीची माणसे सैरभर झाली आहेत. ज्या शरद पवारांनी काँग्रेस फोडली ते आता आपल्या सहकाऱ्यांना कसे रोखणार, अशी टीकाही या संपादकीयमध्ये करण्यात आली आहे.
हेही वाचा - ‘भाजपचा झेंडा दिसला तर घरात घुसून मारू’, काँग्रेस आमदार सुनील केदारांची भाजप कार्यकर्त्यांना धमकी
कधीकाळी संसदेत केवळ 2 खासदार असलेला पक्षदेखील विरोधात असल्यावर सत्ताधाऱ्यांशी भांडत होता. लोकांनी खिल्ली उडवली तरी त्यांनी विचार सोडला नाही. परंतु, आज नेमकी उलट परिस्थिती उद्भवली आहे. कुणालाच विरोधात बसायचे नसून प्रत्येकालाच सत्ता उपभोगायची आहे. 370 च्या मुद्द्यावर काँग्रेसने विरोध केला नाही म्हणून त्रागा करणारे कृपाशंकर सिंग भाजपच्या खेम्यात बसण्याची तयारी दर्शवत आहेत. ही नौटंकी राजकारणात शोभणारी नाही. अशा स्थितीत सर्वांसाठी कवाडं उघडी करणाऱ्या सेना-भाजपने एकदा विचार करावा. अशा संधी-साधूंमुळे संख्याबळ वाढेल परंतु 'पक्षबळ' वाढणार नाही, असा सल्ला या संपादकीयमधून दिला गेला आहे.