नागपूर - पुरुषी रुबाब म्हणून अनेकजण आपल्या मिशांना पिळ देत असतात. मात्र, या मिशीवर न विचारता वस्तरा चालवणं एका सलून मालकाला चांगलेच महागात पडले आहे. न विचारता मिशी कापल्यामुळे एका संतप्त ग्राहकाने सलून मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना जिल्ह्यातील कन्हान या ठिकाणी घडली आहे.
काल (बुधवारी) दुपारच्या सुमारास किरण ठाकूर हे 'फ्रेंडन्स जेंट्स पार्लर' नावाच्या सलूनमध्ये दाढी करायला गेले होते. मात्र, दाढी करत असताना न विचारता त्यांची मिशी कापली, असे ग्राहकाचे म्हणणे आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्राहकाने सलून मालक सुनील लक्षने आणि कामगार आकाश चौधरी यांच्याशी वाद घातला. या वादाचे रुपांतर एकमेकांना धमक्या देण्यात झाले. त्यानंतर हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला.
याप्रकरणी कन्हान पोलीस ठाण्यात सलून मालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ग्राहकाने स्वत: मिशी कापण्यास परवानगी दिल्याचे सलूनमध्ये काम करणाऱ्या कामगाराने म्हटले आहे.