नागपूर - जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. मंगळवारी कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. दिवसभरात जिल्ह्यामध्ये नवे २ हजार २०५ रुग्ण आढळून आले. आजघडीपर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. या नव्या रुग्णांसह नागपुरातील बाधितांची संख्या ४३ हजार २५७ इतकी झाली आहे.
ऑगस्ट महिन्यात नागपुरात २४ हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. मात्र या महिन्याच्या आठच दिवसांमध्ये तब्बल १३ हजार ७०२ रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्ण वाढीचा वेग लक्षात घेता या महिन्यात तब्बल ५० हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनाबाधित होण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.
मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या २ हजार २०५ रुग्णांपैकी ३४९ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तर १ हजार ८५४ रुग्ण हे शहराच्या विविध परिसरातील आहेत. सुखद बाब म्हणजे, मंगळवारी १ हजार ८०३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यासह नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३० हजार ४६१ इतकी झाली आहे.
या शिवाय मंगळवारी ३४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजघडीपर्यंत नागपुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा १ हजार ३९९ इतका झाला आहे. सध्या नागपुरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ७०.५४ टक्के इतके आहे.
हेही वाचा - नागपूर: शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा लाईन अद्याप नादुरुस्त, रुग्णांना मेयोत हलवले
हेही वाचा - फळं नासली...मोसंबीवर फायटोप्थोरा ब्राऊन रॉट बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव