नागपूर - राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. नागपुरात एका कर्करोग झालेल्या ४४ वर्षीय रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. १३ एप्रिलला नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर २४ एप्रिलला त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामध्ये त्याचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर या रुग्णाला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मागील २४ तासात नागपूरात ३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये एका दीड वर्षाच्या मुलासह २ महिलांचा समावेश आहे. आता नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२७ इतकी झाली आहे.
नागपूरात कोरोनाचा उपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्या 6 रुग्णांना सोमवारी सुट्टी देण्यात येणार आहे. यामध्ये मध्यप्रदेशच्या जबालपूर येथील 4 व दोन नागपूरच्या रुग्णांचा समावेश आहे.
नागपुरात आत्तापर्यंत १२७ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहेत. यापैकी १ जणाचा मृत्यू झाला आहे. तर, २३ जण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेले आहेत. तर काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.