नागपूर - फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 हजारांची लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अखेर अटक केली आहे. शंकर बोंडे असे पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून तो पाचपावली पोलीस पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक शंकर बोंडे याने फसवणुकीच्या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी एका तक्रारदाराकडे २ लाखांची मागणी केली होती. सौदा पक्का झाल्यानंतर २ लाखांपैकी ९० हजारांचा पहिला हप्ता बोंडेनी ४ दिवसांपूर्वीच स्वीकार केला. त्यानंतर त्याने उर्वरित पैशासाठी तक्रारदारामागे तगादा लावला होता. त्यामुळे सदर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
हेही वाचा - नागपुरात युवक काँग्रेसकडून राज्यपाल कोश्यारींविरोधात आंदोलन
या तक्रारीनंतर एसीबीच्या पथकाने शुक्रवारी पाचपावली पोलीस ठाण्याभोवती सापळा रचला. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या खोलीत बोंडेने ५० हजार रुपये घेतले. मात्र, सापळा लावून बसलेल्या एसीबीच्या पथकाला इशारा करण्यापूर्वीच बोंडे हा एसीबी पथकाच्या डोळ्यात धूळ झोकून फरार झाला. २ दिवसांनंतर फरार झालेल्या बोंडेला एसीबीने अटक केली आहे. तर दुसरीकडे बोंडे हा स्वतः एसीबी कार्यालयात हजर झाल्याची माहिती समोर आली असून यावर एसीबीकडून दुजोरा मिळालेला नाही.
हेही वाचा - मुख्यमंत्री सहायता निधीच्या धर्तीवर महापौर सहायता निधीची घोषणा